काटोल : काटोल तालुक्यातील ताराबोडी येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी फरार आरोपीस काटोल पोलिसांनी अटक केली आहे. ताराबोडी येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी काटोल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. यात मुलीने लिहिलेल्या चिठ्ठीवरून अमर गदई (रा. शंकरपट, म्हैसेपठार) याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार होता. अखेरीस मंगळवारी काटोल पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. ‘मी अमरवर प्रेम केले, पण त्याने मला धोका दिला. तो माझा गुन्हेगार आहे. तो मुलींच्या आयुष्याशी खेळतो. मुलींची बदनामी करतो,’ अशी सुसाइड नोट लिहून अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ताराबोडी येथे नुकतीच घडली होती. या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी युवकास याची चाहूल लागताच तो गावातून पसार झाला होता. अनेक दिवस होऊनही आरोपी मिळत नसल्याने मुलीच्या पालकांनी आरोपीला अटक करण्याचा तगादा लावला होता. काटोल पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने या आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेरीस खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक भीमाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक आकाश शाही, जयसिंग पवार, आनंद देक्कते, प्रशांत निंभूरकर, रोहिदास शिरसाट, जयदीप पवार यांनी केली.
अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी फरार आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:20 IST