‘मेट्रो’ प्रकल्प मिळविण्यासाठी धडपड : संघस्थानाला दिली भेटनागपूर : ‘देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र’ ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोलाचा वाटा आहे ही बाब लपून राहिलेली नाही. देश व राज्यातील शासनावर संघाच्या प्रभावाची जाणीव जगातील मोठ्या देशांना झाली आहे. त्यामुळेच नागपुरातील ‘मेट्रो’ प्रकल्प फ्रान्सच्या कंपन्यांना मिळावा याकरिता धडपड करत असलेल्या फ्रान्सच्या कॉन्सेल जनरल जीन राफेल पेट्रेग्ने यांनी त्यांच्या नागपूर दौऱ्यादरम्यान संघस्थानाला भेट देऊन संघ पदाधिकाऱ्यांच्या नजरेत येण्याचा प्रयत्न केला. नागपूरला ‘मेट्रो’ प्रकल्पाची घोषणा झाली. सोबतच ‘स्मार्ट सिटी’ बनविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. नागपूरचे भौगोलिक स्थान अन् भविष्यातील मोठे शहर होण्याची क्षमता लक्षात घेता आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे लक्ष इकडे लागले आहे. सप्टेंबर महिन्यात नागपूरच्या दौऱ्यावर आलेल्या फ्रान्सच्या कॉन्सेल जनरल जीन राफेल पेट्रेग्ने यांनी येथील सामाजिक व राजकीय स्थिती जाणून घेतली होती. त्यानंतर केवळ अडीच महिन्यांतच ते परत नागपूर दौऱ्यावर आले. नागपूरमध्ये ‘मेट्रो’ प्रकल्पासाठी अर्थपुरवठा करण्यापासूनच ते हा प्रकल्प फ्रान्सच्याच कंपनीला मिळावा यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. याकरिता दिल्ली व मुंबई येथील राजकीय व्यक्तींशी त्यांनी चर्चा केली व त्यानंतर थेट नागपूर गाठले.
फ्रान्सचे अधिकारी संघाला शरण
By admin | Updated: December 4, 2014 00:47 IST