लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका टोळीने एका तरुणाकडून पाच लाख रुपये घेतले. रोहिणी पवार, केरोल पवार, रमाकांत पवार (सर्व राहणार ठाणे) आणि आकाश बाबाजी पुंडे राहणार अहमदनगर अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचा आणखी एक साथीदार आहे. मात्र त्याचे नाव स्पष्ट झालेले नाही. या सर्वांनी ५ सप्टेंबर २०१६ जरीपटकातील खुशी नगरात राहणारा शार्दुल अजय गोसावी या तरुणाला मर्चंट नेव्हीमध्ये लठ्ठ पगाराची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले. त्याला मर्चंट नेव्हीचे बनावट नियुक्ती पत्र पाठविले.नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे शार्दुलने पोलिसांकडे जाण्याचा धाक दाखवल्यामुळे आरोपींनी त्यांना ऑनलाईन दोन लाख पाच हजार रुपये परत केले. मात्र उर्वरित २ लाख ९५ हजार रुपये परत न करता फसवणूक केली. शार्दुलने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:23 IST