बसोलीचा उपक्रम : आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॅन्सरच्या वेदना आणि कलेचा आनंद या तशा दोन टोकावरच्या दोन गोष्टी. परंतु कलेच्या अंगी दु:ख निवारण्याची अदभूत अशी शक्ती असते. असंख्य सकारात्मक स्पंदनाची निर्मिती तुटलेल्या हृदयाची सहज पुनर्बांधणी करू शकते. निराश जीवनात चैतन्य पेरू शकते, हाच उदात्त विचार डोळ्यापुढे ठेवून बसोली ग्रुपच्या १० ते २० वयोगटातील २५ बाल-तरुण चित्रकारांनी दोन महिन्याच्या अथक परिश्रमाने सुंदर भित्तीचित्राची निर्मिती केली असून, हे चित्र कामठी मार्गावरील एचसीजी एमएनसीएचआरआय या कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांवर मायेची हळवी फुंकर घालणार आहेत. रविवारी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एचसीजी एमएनसीएचआरआय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तयार करण्यात आलेल्या कलादालनात या भित्तीचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. भारतीय संस्कृतीच्या रूपांतराचे प्रतीक म्हणजे हे भित्तीचित्र आहे. पौर्वात्य देश भारत, सूर्याचा देश भारत आणि त्यांच्या तत्त्वाचे पाश्चिमात्य म्हणजेच चंद्राच्या देशात होणारे रूपांतरण, ही या भित्तीचित्राची मूळ संकल्पना आहे. भारतीय जीवनमूल्य, पद्धती आणि पाश्चिमात्य पद्धती अशा दोन भागात या भित्तीचित्राची विभागणी करण्यात आली आहे. चुना, पिवळी माती, गेरू इत्यादी जमीनसदृश भारतीय रंगसंगतीत तर निळा, हिरवा, पिवळा इत्यादी रंगाच्या फिक्कट छटेतील पाश्चिमात्य रंगसंगती या दोन्ही संकल्पनेची विभागणी स्पष्ट दर्शविते. बसोलीचे संस्थापक चंद्रकांत चन्ने यांच्या पत्नी माधवी यांचे कॅन्सरमुळेच निधन झाले. या आजाराच्या वेदना काय असतात, हे त्यांनी जवळून अनुभवले. या वेदनांची तीव्रता आपल्यापरीने काहीअंशी कमी करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबविण्याचे ठरविले. रुग्णालय प्रशासनाचीही त्याला सकारात्मक साथ मिळाली. बसोलीचे हे भित्तीचित्र बसोलीच्या प्रेमळ माईला अर्थात माधवी चन्ने यांना तिच्या प्रेमळ बालकांची चित्रमय आदरांजली आहे. )
कॅन्सरच्या वेदनांवर भित्तीचित्रांची हळवी फुंकर
By admin | Updated: June 4, 2017 01:44 IST