लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सवाचे २ ऑक्टोबर रोजी नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघाच्या सार्वजनिक कार्यक्रमात येणारे ते दुसरे माजी राष्ट्रपती ठरणार आहेत. यापूर्वी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपप्रसंगी २०१८ साली नागपुरात संघस्थानी पोहोचले होते.
सन १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विजयादशमीच्या दिवशीच स्थापना झाली होती. यंदा संघाचे शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे देशभरात संघाकडून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यंदाच्या विजयादशमी उत्सवाला मुख्य अतिथी कोण, याची स्वयंसेवकांसोबतच राजकीय व सामाजिक वर्तुळात उत्सुकता होती. संघाने दीड महिना अगोदरच याची घोषणा केली आहे.
रेशीमबाग मैदानावर २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मुख्य अतिथी असतील. याशिवाय संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे स्वयंसेवकांना उद्बोधन करतील.
२०१८ साली पोहोचले होते मुखर्जी
सन २०१८ मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. याच वर्षी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम हेदेखील कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयच्या समारोपप्रसंगी उपस्थित होते.