लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आईपासून वाट चुकलेला दीड वर्षाचा बिबट जंगलालगतच्या शेतातील पडक्या विहिरीत पडला. वन कर्मचाऱ्यांनी विहिरीत तयार केलेल्या रॅम्पने तो बिबट बाहेर आला आणि जंगलात पळून गेला. विशेष म्हणजे, त्याला कुठेही दुखापत झाली नव्हती. ही घटना हिंगणा तालुक्यातील चौकी शिवारात घडली.कान्होलीबारा परिासरातील चौकी शिवारात प्रदीप भानसे यांचे शेत असून, शेतात अंदाजे १५ फूट खोल पडकी विहिरीत आहे. ही शेती जंगलालगत आहे. त्यामुळे वाट चुकलेला बिबट शेतातील विहिरीत पडला. ही बाब गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कळताच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून त्याला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी विहिरीत रॅम्प तयार करण्यात आला.त्यातच रात्री ८ वाजताच्या सुमारास त्याच्या आईने डरकाळी फोडली आणि विहिरीतील बिबट रॅम्पच्या मदतीने बाहेर आला आणि क्षणार्धात जंगलाच्या दिशेने पळून गेला. त्याला कुठेही दुखापत झाली नाही, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. त्याला वाचविण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे, क्षेत्र सहाय्यक उत्तम भामकर, शेख, दहिवले, पिल्लारे, वनरक्षक इरपाची, राठोड, धाबर्डे, सूर्यवंशी, सोनकुसरे, फुलझेल वन मजूर सुनील भांडेकर यांनी प्रयत्न केले.
वन कर्मचाऱ्यांनी विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 23:19 IST
आईपासून वाट चुकलेला दीड वर्षाचा बिबट जंगलालगतच्या शेतातील पडक्या विहिरीत पडला. वन कर्मचाऱ्यांनी विहिरीत तयार केलेल्या रॅम्पने तो बिबट बाहेर आला आणि जंगलात पळून गेला.
वन कर्मचाऱ्यांनी विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविले
ठळक मुद्देनागपूर नजीक कान्होलीबारा जंगलातील घटना