उमरेड : कोरोनामुळे असंख्य मुले, तरुण-तरुणी सोशल मीडियाच्या अधिकच आहारी गेल्याची कैफियत पालकांची आहे. अनेकांच्या हातात रात्रंदिवस मोबाईल आल्याने पालकांसमोर यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. अशातच उमरेड येथील एका पालकाने आपल्या मुलीस ‘तू अभ्यास का करीत नाहीस? दिवसभर मोबाईलवर गेम का खेळतेस?’ असे म्हणत तिच्याजवळील मोबाईल घेतला. केवळ या क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात त्या तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
अवंती अशोक फुलझेले (वय २०, बाळकृष्णनगर, परसोडी, उमरेड) असे मृत तरुणीचे नाव असून, ती बीसीसीए द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. मृत अवंतीचे वडील अशोक फुलझेले यांनी या प्रकरणी फिर्याद नोंदविली असून, राहत्या घरातील बेडरूममधील सिलिंग पंख्याला दुपट्ट्याच्या साहाय्याने अवंतीने गळफास घेतला. लागलीच तिला उपचाराकरिता उमरेड येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तपासणीअंती डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी उमरेड पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस हवालदार अजितसिंग ठाकूर करीत आहेत.