: कधी सुरू होणार क्लब
वसीम कुरेशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘नागपूर फ्लाईंग क्लब’च्या उड्डाणांना लवकर सुरू करण्याबाबत कुठलेही स्वारस्य नसल्याचे चित्र आहे. डिसेंबरपर्यंत ‘डीजीसीए’ची (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन) चमू पाहणी करेल व महिन्याअखेरील ‘एफटीओ’चा (फ्लाईट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन) परवाना मिळेल असे सांगण्यात येत होते. मात्र आतापर्यंत असे काहीच झालेले नाही.
‘फ्लाईंग क्लब’ची उड्डाणे बंद होऊन साडेतीन वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. त्यांना परत सुरू करण्यासाठी जबाबदारीपूर्वक प्रयत्न झालेले नाहीत. ‘फ्लाईंग क्लब’च्या कामाला प्राथमिकताच देण्यात आलेली नाही. ‘क्लब’ सुरू करण्यासाठी ‘एफटीओ’चा परवाना अत्यावश्यक असून तोच अद्याप मिळालेला नाही. ‘सीएफआय’ व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांना भरण्याच्या दिशेनेदेखील काहीच पावले उचलण्यात आलेली नाही. व्यवस्थापनाकडे कुठलीही तारीख व आकडेवारी नाही. कुठल्याही सरकारी कामात किती दिरंगाई होऊ शकते याचे हा ‘क्लब’ उदाहरण झाला आहे. क्लबची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या ‘डीजीसीए’च्या अधिकाऱ्यांच्या चमूचा सर्व खर्च ‘क्लब’ व्यवस्थापनाकडून केला जातो.
हा प्राथमिक दौरा असेल
‘डीजीसीए’चा चमू लवकरच ‘नागपूर फ्लाईंग क्लब’चा दौरा करेल. हा प्राथमिक दौरा असेल. यानंतर ‘टेस्ट फ्लाईट’ होतील. त्यानंतर ‘डीजीसीए’चा अंतिम दौरा होईल. जर कुठलीही त्रुटी नसली तर ‘एफटीओ’ची परवानगी मिळेल, असे ‘नागपूर फ्लाईंग क्लब’चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद साळवे यांनी सांगितले.