चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी : विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदननागपूर : कामठी तालुक्यातील चिचोली बाबुलखेडा लगतची २०० एकर जमीन शासनाने आयटी पार्क उभारण्यासाठी मंजूर केली होती. परंतु, सध्या आयटी पार्क दुसरीकडे हलविण्याचे प्रयत्न सुरू आहे. आयटी पार्क कामठी तालुक्यातच करा आणि त्यासाठी २०० एकर जागा निश्चित करावी, अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. राज्य शासकीय आयटी पार्क उभारण्यासाठी कामठी तालुक्यातील २०० एकर जमीन मंजूर केली होती. मात्र त्यानंतर सर्वेक्षण, प्राथमिक अहवाल आणि इतर आवश्यक बाबी पूर्ण झाल्यानंतर आयटी प्रकल्पाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी राजकीय खेळी खेळली जात आहे. मात्र कामठी तालुक्यातील चिचोली बाबुलखेडा लगतची २०० एकर जागा त्यासाठी निश्चित करावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.याबाबत विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांना आ. बावनकुळे यांनी निवेदन दिले. चिचोली-बाबुलखेडा हा परिसर पाटणसावंगी-भरतवाडा या राज्यमार्गाला असून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६९ पासून तीन किमी लांब, बाह्य वळण मार्गापासून पाच किमी अंतरावर आहे. चिचोली बाबुलखेडा हा परिसर राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचा आहे. हा आयटी पार्क या भागात साकार झाल्यास परिसराचा सर्वांगिण विकास होईल, असे निवेदनात बावनकुळे यांनी नमूद केले आहे. आयटी पार्कमुळे या भागातील बेरोजगारीचा प्रश्नही सुटू शकतो, असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
आयटी पार्कसाठी जागा निश्चित करा
By admin | Updated: August 6, 2014 01:11 IST