वाडी : नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी संचित रजेदरम्यान (फर्लो) फरार झाला. तब्बल तीन वर्षांपासून पोलीस सदर कैद्याच्या शोधात होते. दरम्यान, सोमवारी फरार कैद्याला अटक करण्यात वाडी पोलिसांना यश आले.राजकुमार केकाजी वानखेडे (५३, रा. मोहाडे ले-आऊट, आठवा मैल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. खून प्रकरणातील सदर आरोपी विरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यानुसार आरोपी हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना ३२ दिवसांचा फर्लो व सात दिवस वाढीव रजा अशा एकूण ३९ दिवसांसाठी अभिवचन रजेवर गेला होता. १५ जून २०१३ ला रजा संपल्यानंतर आरोपी दाखल होणे आवश्यक होते.परंतु आरोपी राजकुमार वानखेडे हा कारागृहात न येता फरार झाला. पर्यायाने अप्पर पोलीस महासंचालक कारागृह पुणे यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने आरोपीविरुद्ध वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. तेव्हापासूनच वाडी पोलीस आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, सोमवारी वाडी पोलिसांनी त्यास नागपूर कारागृहाबाहेर अटक केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल दीपक अवचट, रवींद्र चांदेकर, कृष्णा रोकडे, कमलेश जावळीकर यांनी यशस्वी पार पाडली. (प्रतिनिधी)
फर्लोवरील फरार कैदी पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 03:08 IST