नागपूर : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या प्रकोपानंतर पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात केवळ ३ रुग्ण आढळून आले. यात शहरातील २ तर ग्रामीणमधील १ रुग्ण आहे. रुग्णांची एकूण संख्या ४,९२,८१६ झाली असून सलग आठ दिवसांपासून मृत्यूची संख्या १०,११५वर स्थिरावली आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च २०२० रोजी आढळून आला. त्यानंतर सलग तीन महिने रुग्णसंख्येत चढ उतार दिसून आले. जुलै महिन्यापासून कोरोनाच्या पहिल्या लाटेने वेग धरला. सप्टेंबर महिन्यात ही लाट अधिक तीव्र झाली. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाट ओसरायला सुरुवात झाली. परंतु दैनंदिन रुग्णसंख्या १०च्यावर होती. यामुळे जुलैनंतर पहिल्यांदाच आज रुग्णसंख्या तीनवर आली. यामुळे कोरोना संपला का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होऊन ०.०४ टक्क्यांवर आला आहे. आज २० रुग्ण बरे झाले. सध्या कोरोनाचे २२७ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
-सात दिवसांपासून १०च्या आत रुग्ण
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने एप्रिल महिन्यात उच्चांक गाठल्यानंतर मे महिन्यापासून लाट ओसरायला लागली. १८ जुलैपर्यंत दैनंदिन रुग्णसंख्या १५ ते २० दरम्यान होती. त्यानंतर सलग सात दिवस १०च्या आत रुग्ण तर आता ५च्या आत रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेलाच नाही तर सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
:: कोरोनाची रविवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ७३५१
शहर : २ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : १ रुग्ण व ० मृत्यू
एकूण बाधित रुग्ण :४,९२,८१६
एकूण सक्रिय रुग्ण : २२७
एकूण बरे झालेले रुग्ण : ४,८२,४७४
एकूण मृत्यू : १०११५