किसान कृतज्ञता पर्व : नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना देणार नैतिक बळ शफी पठाण। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान आहे, शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे, अशी मोठमोठी विशेषणे शेतकऱ्यांसाठी वापरली जातात. परंतु कायम कर्जाचे ओझे घेऊन जगणाऱ्या शेतकऱ्याच्या हितासाठी प ्रत्यक्ष जमिनीवर मात्र कुठलेच ठोस प्रयत्न होत नाहीत. या सततच्या उपेक्षेला कंटाळून शेतकरी रोज मृत्यूचा फास गळयात अडकवत आहे. हे चित्र बदलावे, शेतीपूरक व्यवसायाची माहिती देता यावी व शेती अन् आयुष्याकडे पाहण्याचा शेतकऱ्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा, या उद्देशाने येत्या १ जुलै रोजी कृषिदिनी किसान कृतज्ञता पर्व आयोजित करण्यात आले असून देशात पहिल्यांदाच थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन हा दिवस साजरा केला जाणार आहे. आपल्या देशात फादर्स डे, मदर्स डे, फ्रेण्डशीप डे, व्हॅलेंटाईन डे, असे सर्व डे होतात. परंतु शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करता येणाऱ्या कृषिदिनी मात्र सरकारी सोपस्कार आटोपून केवळ तासाभरात हा कार्यक्रम गुंडाळला जातो. आपल्या नावाचा कुठला एक दिवस या देशात साजरा होतोय, हे लाखो शेतकऱ्यांच्या गावीही नसते. म्हणूनच यापुढे हा शेतकऱ्यांच्या हक्काचा दिवस फक्त सरकारी कार्यालयातपुरता मर्यादित न ठेवता या दिवसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे काहीतरी घडावे, या उद्देशाने एकनाथ पवार या कल्पक शिक्षकाच्या संकल्पनेतून तांडा चलो या लोकोत्तर अभियानातंर्गत राज्यभरात किसान कृतज्ञता पर्व आयोजित करण्यात आले आहे. या दिवशी राज्यभरातील सेवाभावी संघटनांचे कार्यकर्ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना कृषी योजना, कृषी तंत्रज्ञान, कृषीपूरक व्यवसाय, स्वयंरोजगाराबाबत माहिती देणार आहेत. सेल्फी विथ फार्मर शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये शेतकरी कृतज्ञतेची मूल्ये रुजवण्यासाठी व समाजातील सर्व घटकांना शेतकऱ्यांशी थेट जोडण्यासाठी ‘सेल्फी विथ फार्मर’ ही अभिनव स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतंर्गत शेतात शेतकऱ्याची भेट घेऊन, त्याला कृषिविषयक माहिती देऊन सेल्फी घ्यायची आहे. ही स्पर्धा नि:शुल्क असून निवडक सेल्फींना पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविले जाणार आहे. वसंतराव नाईकांना ही खरी श्रद्धांजली ज्यांच्या नावाने कृषिदिन साजरा होतो ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक नेहमी म्हणायचे, माझे मन मंत्रालयाच्या एसी कार्यालयापेक्षा शेतावर जास्त रमते. परंतु आजची व्यवस्था तसा विचार करताना दिसत नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यभरातून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पुढच्या कृषिदिनापासून शासनाने हा उपक्रम स्वत:च्या हातात घ्यावा, अशी या उपक्रमात सहभागी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. -एकनाथ पवार , संयोजक, किसान कृतज्ञता पर्व
देशात पहिल्यांदाच कृषिदिन थेट बांधावर
By admin | Updated: June 22, 2017 02:18 IST