लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : आधीच काेराेना संक्रमणाचे संकट. त्यात घरांना लागलेली आग. यामुळे रुयाड (ता. कुही) येथील तीन कुटुंबीयांच्या संकटात भर पडली असून, या आगीत घरातील संपूर्ण साहित्य व घराची राखरांगाेळी ते उघड्यावर आले आहे. आगीची ही घटना गुरुवारी (दि. २९) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. यात किमान ३ लाख ८५ रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती या तिन्ही आगपीडितांनी दिली. या आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.
काेराेनाच्या वाढत्या संक्रमणामुळे ग्रामीण भागातील नागरिक सध्या जीव मुठीत घेऊन जगत आहेत. त्यातच गुरुवारी दुपारी रुयाड (बांध) येथील कैलास डहारे यांच्या घराला आग आली. ही बाब लक्षात येताच गावातील तरुणांसह नागरिकांनी ती विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, ताेकड्या प्रयत्नामुळे ही आग पसरत गेली आणि आगीने कैलास डहारे यांच्या घराच्या शेजारील अंबादास डहारे व जगदीश डहारे या दाेघांचीही घरे कवेत घेतली.
स्थानिकांनी गावातील बाेअरवेल्स व विहिरींमधील माेटरंपप सुरू करून पाण्याचा मारा करायला सुरुवात केली. ही आग नियंत्रणात येईपर्यंत तिन्ही घरातील बहुतांश वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या हाेत्या. या आगीत किमान ३ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती या तिन्ही आगपीडितांनी दिली. माहिती मिळताच आ. राजू पारवे, जिल्हा परिषद सदस्य मनीषा फेंडर, भागेश्वर फेंडर, सरपंच नेहा ढेंगे, नायब तहसीलदार प्रकाश हारगुडे, तलाठी विठ्ठल सूर्यवंशी, ग्रामसेवक लिंगायत, उपासराव भुते, सुनील किंदर्ले, सुधीर पिल्लेवान, ओमदेेेव ढेंगे यांनी घटनास्थळाची पाहणी करून आगपीडितांना दिलासा दिला. या आगीचे कारण मात्र कळू शकले नाही. शासनाने या तिन्ही आगपीडितांना घरकूल मंजूर करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
...
सुदैवाने प्राणहानी टळली
घरातील ज्येष्ठ मंडळी राेजगार हमी योजनेच्या कामावर गेली असल्याने घटनेच्या वेळी या तिन्ही घरांमध्ये केवळ लहान मुले हाेती. आग लागल्याचे लक्षात येताच सर्व जण लगेच घराबाहेर पडले. त्यामुळे या आगीत प्राणहानी झाली नाही अथवा कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, तिन्ही घरातील धान्य, कपडे, राेख रक्कम, एक बोकड, कोंबड्या, सायकल तसेच गृहाेपयाेगी व इतर इतर साहित्य जळून राख झाले. विशेष म्हणजे, तिन्ही कुटुंब अत्यंत गरीब आहेत.