नागपूर : क्रूरकर्मा राजेश धन्नालाल दवारे (वय १९) आणि अरविंद अभिलाष सिंग (वय २३) या दोघांच्याही घरांची आज पोलिसांनी झडती घेतली. चिमुकल्या युग मुकेश चांडक (वय ८) याचे अपहरण आणि हत्या करताना त्यांनी वापरलेले कपडे आणि दोन्ही दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या. यासोबतच आज पोलिसांनी घटनेपूर्वी त्यांना चिमुकल्या युगसोबत पाहाणाऱ्या काही जणांचे बयानही नोंदवले. १ सप्टेंबरच्या दुपारी ४ वाजता राजेश आणि अरविंदने चिमुकल्या युगचे अपहरण केले. अपहरण करताना डॉ. मुकेश चांडक यांच्या घरापासून तो राजेश याच्या कळमन्यातील घरापर्यंत युगला त्यांनी स्कुटीवर बसवून नेले. स्कुटीचा वेग कमी असल्यामुळे त्यांनी नंतर राजेशच्या घरी असलेली डिलक्स मोटरसायकल घेतली. या मोटरसायकलने युगला घटनास्थळी नेऊन त्यांनी ठार मारले आणि नाल्यात मृतदेह लपवून ठेवला. हे भयावह कृत्य केल्यानंतर दोघेही नागपुरात परतले. दोघांनी आपले कपडे बदलवले. त्यानंतर राजेश लकडगंज ठाण्यात पोहचला. दुसऱ्या दिवशी या थरारक प्रकरणाचा खुलासा झाला. तेव्हापासून पोलीस या प्रकरणातील विखुरलेले धागेदोरे जोडण्याचे प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, आज पोलिसांनी राजेश याच्या कळमना आणि अरविंदच्या नारा रोडवरील घराची झाडाझडती घेतली. घटनेच्या वेळी त्यांनी जे कपडे घातले होते, ते पोलिसांनी आरोपींच्या घरातून जप्त केले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्कुटी आणि मोटरसायकलही जप्त केली. युगला या दोघांनी राजेशच्या घरी नेले होते. ‘माझ्या मॅडमचा मुलगा आहे, त्याला फिरायला आणले‘, असे त्याने नातेवाईक महिलेला सांगितले होते. ही माहिती उघड झाल्यामुळे आज पोलिसांनी त्या महिलेचेही प्राथमिक बयाण नोंदवून घेतले. (प्रतिनिधी)पोलिसांच्या हाती भक्कम पुरावाया क्रूरकर्म्यांचे पाप उघड करण्यास मदत करणारा भक्कम पुरावा लकडगंज पोलिसांना मिळाला. राजेश आणि अरविंदने निरागस युगला मोटरसायकलवर बसवून कोराडी मार्गाने नेले होते. जाताना त्यांनी एका पंपावर पेट्रोल भरले. या पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे १ सप्टेंबरचे फुटेज आज लकडगंज पोलिसांनी तपासले. या फुटेजमध्ये राजेश,अरविंद आणि या दोघांच्या मध्ये बसलेला युग स्पष्ट दिसत आहे. या क्रूरकर्म्यांच्या पापाची साक्ष पटविण्यास मदत करणारे हे फुटेज पोलिसांनी जप्त केले.
राजेशच्या घराची झडती
By admin | Updated: September 6, 2014 03:03 IST