मोहन भागवत : थॅलेसिमिया जागरूकता अभियानाला प्रारंभ नागपूर : मानवी जीवन आहे तेथे रोगही आहेत. एखाद्या रुग्णाला रोग होणे हा गुन्हा नाही. ती संपूर्ण आरोग्यातली एक उणीव आहे. हे संपूर्ण जगच उणिवांनी भरलेले आहे. तशीच मानवी जीवनात रोगांमुळे रुग्णात निर्माण होणारीही एक उणीव आहे. यामुळे रुग्णांनी खचून जाण्यासारखे काहीच नाही. मानवी जीवनात रोगांची लागण होणे अनादिकाळापासून आहे; पण मानवी जीवन अब्जावधी वर्षांपासून सुरू आहे. प्रत्येकाने परस्परांची उणीव आपापल्या क्षमतेने भरून काढण्याचा प्रयत्न केला तर हे जग खूप सुंदर आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्षमतांचा उपयोग इतरांच्या उणिवा भरून काढण्यासाठी करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी केले. थॅलेसिमिया सोसायटी आॅफ सेंट्रल इंडियातर्फे थॅलेसिमिया, सिकलसेलबाबत जागरूकता अभियानाला आजपासून प्रारंभ करण्यात आला. या अभियानाचा प्रारंभ करताना भागवत बोलत होते. हे अभियान डॉ. विंकी रुघवानी यांनी सुरू केले आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विंकी रुघवानी, घनश्याम कुकरेजा, डॉ. दिलीप गुप्ता उपस्थित होते. हा कार्यक्रम डॉ. रुघवानी यांच्या जरीपटका येथील रुग्णालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी भागवत म्हणाले, काही रोग येतात आणि जातात; पण काही रोगांची साथ मात्र आयुष्यभर असते. या रोगांना समजून घेतले तर आयुष्य आनंदाने जगता येते. अशा रुग्णांना मदतीची आणि आत्मियतेची गरज असते. अर्धा रोग औषधाने आणि रोगामुळे बिघडलेली मानसिकता आपुलकीने, प्रेमाने सुधारते. आपल्या सर्व क्षमतांचा उपयोग सेवाभावनेने लोकांनी केला तर समाजातली अनेक दु:ख दूर होतील, असे ते म्हणाले. याप्रसंगी थॅलेसिमिया रु ग्ण कुमार भुरे आणि रुग्णाच्या पालक वैशाली बगाडे यांनी डॉ. रुघवानी यांच्यामुळे आलेले सुखद अनुभव यावेळी सांगितले. डॉ. रुघवानी यांनी प्रास्ताविकेतून या अभियानाची माहिती दिली. याप्रसंगी थॅलेसिमिया रुग्णांना मदत करणाऱ्या विजय केवलरामानी, संपत रामटेके, डॉ. गोपाल अरोरा, जी. टी. रुघवानी, लक्ष्णराव पार्डीकर यांचा सत्कार करण्यात आला. रुग्णांना थॅलेसिमियाबाबत माहिती देण्यात आली आणि त्याचे उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मोहन भागवत यांनीही यावेळी काही रुग्णांशी संवाद साधला. (प्रतिनिधी)
आपल्या क्षमतांनी इतरांची उणीव भरून काढा
By admin | Updated: October 9, 2014 01:03 IST