लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास भादंवि कलम २८३ अन्वये संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा नोंदविला जाणार आहे. जर कंत्राटदारावर गुन्हा नोंदविला नाही तर भादंवि कलम २१७ अन्वये संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तअभिजित बांगर यांनी शनिवारी दिले.शहरातील खड्डे दुरुस्तीसंदर्भात समन्वयन समितीच्या मागील बैठकीमध्ये सात दिवसात शहरातील खड्डे बुजविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. याचा आढावा घेण्यासाठी महापालिका मुख्यालयातील सभागृहात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. अजूनही रस्त्यांची स्थिती समाधानकारक नसल्याने यावर त्यांनी नाराजी व्यक्त करून, निष्काळजीपणा करणारे कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले.यावेळी मुख्य अभियंता उल्हास देबडवार, समितीचे सदस्य सचिव मनपा अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, नागपूर पोलीस उपायुक्त (वाहतूक) चिन्मय पंडित, एनएमआरसीएलचे प्रकल्प संचालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, नागपूर सुधार प्रन्यासचे अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक, अधीक्षक अभियंता, एमएसईडीसीएल, जलप्रदाय, विद्युत, हॉटमिक्सचे कार्यकारी अभियंता प्रामुख्याने उपस्थित होते.नागपूर शहरात विविध शासकीय यंत्रणेच्या मालकीचे रस्ते आहेत. शहरात विविध यंत्रणेद्वारे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यामुळे ठिकठिकाणी केबलिंगसाठी व अन्य कामांसाठी खोदकाम केले जाते. अवजड यंत्रसामुग्री व साहित्य रस्त्यावर असते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. विविध शासकीय यंत्रणांचा समन्वय साधण्यासाठी ही समिती गठित करण्यात आली आहे.सर्व शासकीय यंत्रणेच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वत: रस्त्यावर फिरून कुठे खड्डे दिसून येत असेल तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी. खड्ड्यांबाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असा इशारा आयुक्तांनी दिला. मागील बैठकीत सर्व विभागांना त्यांच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांची यादी देण्यात आली होती. त्यापैकी काही रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडुजी झाली. परंतु अद्यापही अनेक रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : मनपा आयुक्तांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 22:20 IST
खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास कंत्राटदारावर गुन्हा नोंदविला नाही तर भादंवि कलम २१७ अन्वये संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शनिवारी दिले.
कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : मनपा आयुक्तांचे निर्देश
ठळक मुद्देखड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधितांना दोषी धरणार