चोऱ्या, घरफोड्या उघडकीस : रोख अन् मुद्देमाल जप्त नागपूर : पाचपावली पोलिसांनी दोन अट्टल चोरट्यांना शिताफीने जेरबंद केले. त्यांच्याकडून सहा चोऱ्या, घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणून रोख तसेच चोरीचा मुद्देमाल जप्त केला.गुड्डू उर्फ शेख इजराईल शेख करिम (वय २१) आणि इमरान अन्सारी कमल अन्सारी (वय २०) अशी या चोरट्यांची नावे आहेत. हे दोघेही पिवळी नदी, संघर्षनगर झोपडपट्टीत राहतात. पाचपावलीचे पोलीस पथक रविवारी गस्त घालत असताना मोतीबाग नोव्हा कंपनीजवळ इजराईल आणि इमरान संशयास्पद अवस्थेत आढळले. त्यांना विचारपूस केली असता ते उडावाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. येथे चौकशीदरम्यान आरोपींनी पाचपावलीतील एका लुटमारीची कबुली दिली. त्यानंतर जरीपटक्यातील साई आॅप्टिकलमधील घरफोडी, कामठी मार्गावरील एका अपार्टमेंटमधून चोरलेल्या मोटरसायकलची (एमएच ३१/ बीएन ९९९६), कोतवालीतील अश्विन ज्वेलर्समधील चोरी, नरसिंग इस्पितळातील ७० हजारांची चोरी, तहसीलमधील एका ट्रान्सपोर्टमध्ये केलेली चोरी अशा एकूण सहा चोऱ्यांची घरफोड्यांनी कबुली दिली. पोलिसांनी हे सर्व साहित्य त्यांच्याकडून जप्त केले. पाचपावलीचे ठाणेदार दीपक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार नरसिंग जोहर, नायक उमेश खोब्रागडे, सारिपुत्र फुलझेले, गिरीश काळे, मनीष बुरडे, शंभू सिंग, पंकज लांडे आदींनी ही कामगिरी बजावली. आरोपी इजराईल आणि इमरानचा आज कोर्टातून एक दिवसाचा पीसीआर मिळवण्यात आला. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.(प्रतिनिधी)चोरीच्या मालातून ऐषोआरामइजराईल आणि इमरानची ही जोडगोळी गेल्या अनेक दिवसांपासून चोऱ्या, घरफोड्या करीत आहे. चोरीच्या दुसऱ्याच दिवशीपासून हे दोघे नवीन कपडे, खाण्यापिण्याच्या चीजवस्तू खरेदी करून आपल्या व्यसनावर पैसे उधळतात. पैसे संपल्यावर पुन्हा ते नवीन ठिकाणी हात मारण्यासाठी फिरतात. शहरात घडलेल्या अनेक घटनांत त्यांचा हात असण्याची शंका पोलिसांना आहे.
पाचपावली पोलिसांनी पकडले अट्टल चोरटे
By admin | Updated: July 22, 2014 00:55 IST