मानकापुरात प्रचंड तणाव : ट्रक जाळला, लाठीमारनागपूर : भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे एका तरुण व्यावसायिकाचा करुण अंत झाला. आज दुपारी २ च्या सुमारास झिंगाबाई टाकळी परिसरात हा भीषण अपघात झाला. अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने ट्रकचालकाची बेदम धुलाई करून ट्रकला आग लावली. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केल्यामुळे अपघातस्थळी प्रचंड तणावाचे वातावरण होते. मानकापूर येथील हार्डवेअर व्यावसायिक आणि अभियंता विपीन तुकाराम टापरे (वय २८) हे आज दुपारी २ च्या सुमारास गोधनीकडून झिंगाबाई टाकळीकडे डिओने (एमएच ३१/ सीडब्ल्यू ३२७६) जात होते. मागून आलेल्या भरधाव ट्रक (एमएच ३१/ सीबी ९०५७) च्या चालकाने विपीनला चिरडले. अनेकांदेखत हा भीषण अपघात घडला. अपघाताला आरोपी ट्रकचालक विलास देवरावजी देशभ्रतार (वय ४७, रा. गोरेवाडा) याचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे पाहून जमाव संतप्त झाला. जमावाने आरोपी विलासला ट्रकखाली खेचून त्याची बेदम धुलाई केली. ट्रकवर तुफान दगडफेक केली अन् कॅबिनलाही आग लावली. दरम्यान, अपघाताची माहिती कळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. बेशिस्त वाहनचालकाकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत असल्याची भावना झाल्यामुळे जमावाने पोलिसांवरही दगड भिरकावले. परिस्थिती चिघळल्याचे पाहून पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. जमावाच्या तावडीतून आरोपी चालक विलास देशभ्रतारला ताब्यात घेतले. नितीन वानखेडेंनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विलासला पोलिसांनी अटक केली. (प्रतिनिधी)वडील मुंबईला अन् .. .अपघातात ठार झालेल्या विपीनचे वडील हार्डवेअर चालवतात. ते मुंबईला गेले आहेत. विपीनचा भाऊ नाशिकला राहतो. विपीनला पत्नी कुमुदिनी आणि दोनच महिन्याची मुलगी असल्याची माहिती आहे.
भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले
By admin | Updated: August 17, 2014 00:53 IST