एक हजाराची लाच : वाहतूक व्यावसायिकाची तक्रार लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहतूक व्यावसायिकाला नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महिला सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) जेरबंद केले. जिजाबाई गोविंदराव धुर्वे (वय ४५) असे तिचे नाव असून, ती लाव्हा (वाडी) ग्रामपंचायतची सरपंच आहे. तक्रारकर्ते वाहतूक व्यावसायिक असून त्यांचे लाव्हा ग्रामपंचायतच्या हद्दीत वाहतूक व्यवसायाचे कार्यालय आहे. त्यांना जी.एस.टी. नंबर मिळण्याकरिता ग्रामपंचायतीच्या नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतमध्ये रीतसर अर्ज दिला होता. मात्र, ग्रामपंचायतीकडून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे तक्रारकर्त्याने सरपंच जिजाबाई धुर्वे यांची भेट घेतली. त्यांनी तक्रारदारास नाहरकत प्रमाणपत्र देण्याकरिता एक हजार रुपये लाच मागितली. लाच द्यायची इच्छा नसल्यामुळे तक्रारकर्त्यांनी एसीबीच्या कार्यालयात तक्रार नोंदवली. एसीबीचे अधीक्षक पी.आर. पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जिजाबार्इंना पकडण्यासाठी सापळा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार, गुरुवारी दुपारी एसीबीच्या पोलीस निरीक्षक भावना धुमाळे, पोलीस निरीक्षक मोनाली चौधरी, पोलीस निरीक्षक कविता इसारकर, नायक सुनील कळंभे, शंकर कांबळे, सरोज बुधे, परसराम साही यांनी सापळा लावून लाचेची रक्कम स्वीकारताच जिजाबार्इंना पकडले. नवे अधिकारी, दुसरी कारवाईएसीबीचे अधीक्षक म्हणून एक आठवड्यापूर्वी पी.आर. पाटील यांनी सूत्रे स्वीकारली आहे. तेव्हापासून त्यांच्या मार्गदर्शनात तीन दिवसात झालेली ही दुसरी कारवाई आहे. दोन दिवसांपूर्वी भंडारा येथे एक लाचखोर लोकसेवक पकडला गेला तर आता जिजाबाई गजाआड झाली.
महिला सरपंच एसीबीच्या सापळ्यात
By admin | Updated: June 23, 2017 02:30 IST