नागपूर : नवरा आणि सासू-सासऱ्याकडून होणारा छळ असह्य झाल्यामुळे एका महिला बँक अधिकाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. वृशाली आशुतोष हावरे (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या आत्महत्येला नवरा आणि सासू-सासरे कारणीभूत असल्याची तक्रार वृशालीच्या आईने दिल्यामुळे अंबाझरी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला. वृशाली मूळची अमरावती येथील रहिवासी होती. दर्यापूर येथील आशुतोष हावरेसोबत ४ वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. उच्चशिक्षित अन् महत्त्वाकांक्षी वृशालीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा पास केल्यानंतर तिची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली होती. मात्र, याचवेळी तिची सेंट्रल बँकेतही निवड झाली. त्यामुळे तिने सहायक व्यवस्थापक म्हणून बँकेत नियुक्ती स्वीकारली. गेल्या वर्षीच तिची नागपुरात बदली झाली होती. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, भरतनगरातील सौजन्य अपार्टमेंटमध्ये ती राहत होती. तिचे सासरही दर्यापुरातील प्रतिष्ठित कुटुंबं मानले जाते. सासू-सासरे दोघेही लठ्ठ पगाराच्या नोकरीवर होते. लग्नाला ४ वर्षे झाली तरी तिला मूलबाळ नव्हते. त्यात आशुतोष कामधंदा करीत नव्हता. त्यामुळे पती-पत्नीत नेहमी खटके उडायचे. बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. माहिती कळताच प्रारंभी पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली. नंतर मात्र वृशालीची आई मालती शाहुराव साबळे (वय ५६) यांनी अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. वृशालीला तिचा नवरा आणि सासू सासरे तीन वर्षांपासून छळत होते. हा छळ असह्य झाल्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचे साबळे यांनी तक्रारीत नमूद केले. वृशालीने या छळाबाबत अनेकदा आपल्याकडे (माहेरी) माहिती दिली. मात्र, आज ना उद्या सगळे व्यवस्थित होईल, अशी आशा असल्यामुळे आपण तिची समजूत काढत होतो.परंतू आरोपींकडून होणारा छळ असह्य झाल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचेही पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी आशुतोष रमेश हावरे त्याचे वडील रमेश हावरे आणि आई उषा हावरे यांच्याविरुद्ध कलम ३०६ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला. (प्रतिनिधी)
महिला बँक अधिकाऱ्याची आत्महत्या
By admin | Updated: March 31, 2017 03:03 IST