लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : नऊ महिन्यांपूर्वी एकुलत्या एक तरुण मुलाने केलेल्या आत्महत्येचे दु:ख आणि वाढते कर्जबाजारीपण यामुळे सतत चिंतित असलेल्या शेतकऱ्याने शेतात विषारी औषध प्राशन करून स्वत:ची जीवनयात्रा संपविली. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सुसुंद्री येथे बुधवारी (दि. १४) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.
चंद्रशेखर काळे, रा. सुसुंद्री, ता. कळमेश्वर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. चंद्रशेखर यांच्याकडे चार एकर शेती असून, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. सततची नापिकी आणि वाढते कर्जबाजारपण यामुळे ते चिंतित हाेते. त्यातच त्यांनी नऊ महिन्यांपूर्वी त्यांच्या थाेरल्या मुलीचे लग्न केले. त्यासाठी त्यांना नातेवाईक व इतरांकडून उसनी रक्कम घ्यावी लागली हाेती. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांना समाधानकारक पीक झाले नाही. त्यामुळे त्यांना कर्जपरतफेडीची चिंता भेडसावत हाेती. तरुण मुलाचा आधार गेल्याने त्यांचे मनाेधैर्य खचले हाेते.
दरम्यान, ते बुधवारी सकाळी शेतात गेले. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, ते शेतात बेशुद्धावस्थेत पडून असल्याचे आढळून आले. या प्रकाराची माहिती मिळताच पंचायत समिती सभापती श्रावण भिंगारे यांनी पाेलिसांना सूचना दिली व चंद्रशेखर यांना कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घाेषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित व एक अविवाहित अशा दाेन मुली आहेत. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.
...
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आत्महत्या
चंद्रशेखर काळे यांना गाैरव (२१) हा एकुलता एक मुलगा हाेता. त्यांनी त्यांच्या थाेरल्या मुलीचे नऊ महिन्यांपूर्वी लग्न केले. त्यासाठी मित्र व इतरांकडून कर्जही घेतले हाेते. बहिणीचे लग्न आटाेपल्यानंतर दुसऱ्या दिवशी गाैरवने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. तरुण मुलगा अचानक गेल्याने त्यांचे मनाेधैर्य खचले हाेते. वाढते कर्जबाजारपण आणि धाकट्या मुलीच्या लग्नाची चिंताही त्यांना भेडसावत हाेती. गाैरव गेल्यापासून ते सतत चिंतित असायचे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
...
शेती विकायला काढली
चंद्रशेखर यांनी बँक व इतरांकडून कर्ज घेतले हाेते. मात्र, त्यांनी कुणाकडून किती कर्ज घेतले हाेते, याची माहिती मिळू शकली नाही. या कर्जाची परतफेड करणे शक्य व्हावे म्हणून त्यांनी काही शेती विकायला काढली हाेती. ग्राहक न मिळाल्याने त्यांना ती विकणेही शक्य झाले नाही. ‘तुम्ही असे करायला नकाे हाेते. माझा नव्हे तर निदान मुलीचा तरी विचार करायला हवा हाेता’, असे म्हणत त्यांच्या पत्नीने हंबरडा फाेडला हाेता. घरातील पुरुष माणसं गेल्याने काळे कुटुंबीयांवर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे.