Ganesh Chaturthi 2018; वेगवान व लयबद्ध स्वरांचे अद्भूत संमोहन, संदल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 10:32 AM2018-09-13T10:32:12+5:302018-09-13T10:35:40+5:30

ज्याला संदल ऐकायला आवडत नाही असा माणूस विदर्भात सापडणार नाही. गणेशोत्सव असो वा नवरात्र, संदलचे पथक असल्याविना त्याला जणू पूर्णत्व येतच नाही. ज्याला नाचता येत नाही वा नाचायलाच आवडत नाही असा मनुष्यही संदल ऐकता ऐकता नकळत पायाचा ठेका देऊ लागतो.

Fast and rhythmic vowels, amazing Sandal! | Ganesh Chaturthi 2018; वेगवान व लयबद्ध स्वरांचे अद्भूत संमोहन, संदल!

Ganesh Chaturthi 2018; वेगवान व लयबद्ध स्वरांचे अद्भूत संमोहन, संदल!

Next
ठळक मुद्देअवघ्या गावाला मिळतो सणासुदीत रोजगार

वर्षा बाशू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: ज्याला संदल ऐकायला आवडत नाही असा माणूस विदर्भात सापडणार नाही. गणेशोत्सव असो वा नवरात्र, संदलचे पथक असल्याविना त्याला जणू पूर्णत्व येतच नाही. मुलं-मुली या संदलच्या तालावर बेधुंद होऊन तासनतास नाचू शकतात. एवढेच नाही तर ज्याला नाचता येत नाही वा नाचायलाच आवडत नाही असा मनुष्यही संदल ऐकता ऐकता नकळत पायाचा ठेका देऊ लागतो. असा हा सुरेल, दमदार आणि साधा वाद्यप्रकार विदर्भाचे भूषण ठरला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगावचा संदल हा सर्वात ख्यातीप्राप्त संदल आहे.

संदल म्हणजे नेमके कोणते वाद्य?
संदल म्हणजे ढोल ताशातील ताशा या वाद्यप्रकाराचाच एक प्रकार. संदलचे मूळ यवतमाळ जिल्ह्यातल्या बाभूळगाव हे असल्याचे सांगितले जाते. बाभूळगावचे सय्यद नूरभाई यांचा हा पिढीजात व्यवसाय आहे. त्यांनी त्याला अभिजात कलेसारखे जपले व वाढवले आहे. या ताशाला लाकूड व छत्रीच्या तारांपासून बनवलेल्या काड्यांनी वाजवले जाते. ताशाला संदलची मंडळी भांडे म्हणतात तर वाजवण्याच्या काड्यांना चोपा वा डंगे म्हणतात. ताशावर पूर्वी चामडे लावले जायचे. आता मोटर वायडिंग पेपर लावला जातो. १०-१२ तरुणांचे गळ््यात ताशा अडकवलेले पथक कोंडाळे करून लाकडाच्या जाड काडीने ताशामधून विविध सुरावटी जेव्हा अतिशय वेगाने काढू लागते तेव्हा ऐकणाऱ्याचे देहभान हरपून जाते.

संदलमध्ये वाजविल्या जाणाऱ्या विविध सुरावटी
संदलमध्ये अनेक सुरावटी वाजवल्या जातात. त्यात सर्वात जास्त लोकप्रिय सुरावट आहे बिजली किंवा बारिश. पावसाचे पाणी वेगाने पडत असल्याचा भास यावेळी होतो. कधी ते मंदावते तर लगेचच पुन्हा वेगाने पडू लागते. यासोबतच फटाक्याची लड, शेर, भांगडा, दांडिया, डिस्को, मोहर्रम, नाशिक ढोल, लावणी, काश्मिरी, रेल्वे अशा अनेकविधी सुरावटी वाजवल्या जातात. प्रत्येक सुरावट ही आधी हळू स्वरात सुरू होऊन शेवटी तीव्र होत जाते. त्याचा वेग व आवाज टिपेला पोहचतो तेव्हा थिरकणाऱ्या तरुणाईच्या उत्साह व जोमासोबत त्या

ची स्पर्धा असते.

बाभूळगावातील बच्चा बच्चा वाजवू शकतो संदल
बाभूळगावातील मुलगा हा त्याच्या आईच्या पोटातूनच ही कला शिकून येतो असे सांगणे आहे सय्यद नूरभाई यांचे. जर त्याला संदल शिकायचाच आहे तर तो काही दिवसातच वाजवणे शिकू शकतो यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. बाभूळगावातील संदलला सणासुदीच्या काळात मोठी मागणी असते. थेट दिल्ली, बंगलोरहून बोलावणे येते. या गावातील तरुण मुलांसाठी हे रोजगाराचे एक मोठे माध्यम बनले आहे.
बाभूळगावासोबतच धामणगाव, अमरावती या जिल्ह्यांमध्येही संदलचे प्रस्थ वाढते आहे.

Web Title: Fast and rhythmic vowels, amazing Sandal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.