शहरात पोळा उत्साहात : आज तान्हा पोळाची धूमनागपूर : श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे ह्यपोळा.ह्ण असा हा पोळा आज शहरात उत्साहात साजरा झाला. अनेक शेतकरी कुटुंबांनी बैलांची आरती ओवाळून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. उद्या शुक्रवारी बालगोपालांचा तान्हा पोळा साजरा होणार आहे. आज सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना आंघोळ घालून त्यांची रंगरंगोटी केली. आपल्या लाडक्या बैलांचा शृंगार करून त्यांना नवे वस्त्र घातले. बँड-बाजासह शेतकरी पोळ्याच्या मिरवणुकीत सहभागी झाले. अनेक शेतकरी बँडबाजाच्या तालावर नाचताना दिसत होते. शहराच्या बहुतांश भागात चौकाचौकात फुगे, खेळणी, अल्पोपहाराची दुकाने लागली होती. सामाजिक, धार्मिक, राजकीय संस्थांतर्फे आयोजनपोळा उत्सव साजरा करण्यासाठी उपराजधानीच्या वर्धा रोड, सोेनेगाव, खामला, गोपालनगर, बजाजनगर, शंकरनगर, गोकुळपेठ, रामदासपेठ, अयोध्यानगर, तुकडोजी पुतळा, बिडीपेठ, सुभेदार ले-आऊट, मानेवाडा, रेशीमबाग, नंदनवन, सक्करदरा, पारडी, महाल, सदर, इंदोरा, गड्डीगोदाम, गिट्टीखदान या भागात अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय संस्था, संघटनांतर्फे चौकात तोरण बांधण्यात आले. येथे सायंकाळी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजवून आणले होते. मिरवणुकीमुळे उपराजधानीत गावासारखे वातावरण निर्माण झाले होते. पोळा फुटल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना घरी नेले. घरी शेतकरी आणि बैलांचे पाय धुतल्यावर त्यांची टिळा लाऊन आरती करण्यात आली. यावेळी बैलांना विविध प्रकारचे पक्वान्न खाऊ घालण्यात आले. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांनी व्यक्त केली बैलांप्रति कृतज्ञता
By admin | Updated: September 2, 2016 02:53 IST