गुमगाव : हिंगणा-गुमगाव मार्गाच्या रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. एकीकडे रस्ते विकासाची कामे सुरू आहेत मात्र दुसरीकडे स्थानिक शेतकऱ्यांचे स्वप्न हे 'धुळीने' माखले आहे. या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनांच्या प्रचंड वर्दळीमुळे मार्गालगतच्या शेतातील उभ्या पिकांवर धूळ साचली आहे. परिणामी कापूस, तूर, भाजीपाला पिकांवर उडत असलेल्या धुळीमुळे संबंधित शेतकऱ्यांच्या शेकडो एकरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यंदा खरीप हंगामात सततचा पाऊस व परतीच्या पावसाचाही फटका गुमगाव परिसरातील शेतकऱ्यांना बसला. परिणामी यावर्षी शेती व्यवसाय हा पूर्ण तोट्यात आला आहे. सदर हिंगणा- गुमगाव मार्ग अतिशय वर्दळीचा असून हिंगणा व बुटीबोरी या दोन्ही औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातील अवजड वाहने याच मार्गाने ये-जा करतात. या मार्गाचे काम गत चार वर्षांपासून रेंगाळले आहे. मध्यंतरी काही प्रमाणात बांधकामाने वेग घेतल्यानंतर पुन्हा मार्गाचे बांधकाम बंद अवस्थेत आहे. सुकळी गुपचूप ते गुमगाव एफएससीच्या पतंजली गोडाऊन परिसरातून गेलेल्या बाह्यवळण मार्गापर्यंत कुठे मार्गाच्या एकाच बाजूने बांधकाम झाले आहे तर काही ठिकाणी गिट्टी, मुरूम व खोदलेल्या मातीचे ढिगारे जागोजागी दृष्टिपथास येत आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहने जाताच पाठीमागून धूळ उडत असते. ही धूळ मार्गालगतच्या पिकांवर जाऊन पिकांची नासाडी करीत आहे. त्यातच धुळीने माखलेला कापूस वेचणी करण्यास मजूरही धजावत नाहीत. तुरीची झाडेही जागच्या जागी सुकून जात असल्याने शेतकऱ्याना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर या 'धुळधाणी 'मुळे पिकांच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. धुळीमुळे पिकांचे होणारे नुकसान थांबविण्यासाठी संबंधित विभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गुमगाव , कोतेवाडा, खडका, सुकळी, शिवमडका आदी गावांतील शेतकऱ्यांमधून होत आहे.
शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीने माखले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:10 IST