ओपीडीपासून एक किलोमीटरवर औषधालय : अर्ध्या किलोमीटरवर नोंदणी खिडकी नागपूर : मेडिकलमध्ये येणाऱ्या नेत्ररोग रुग्णांची वर्षभरापासून फरफट सुरू आहे. नेत्ररोग विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात केवळ तपासणी होत असल्याने रुग्णांना नवीन नोंदणी कार्ड तयार करण्यापासून ते औषधे, शस्त्रक्रिया कक्ष आणि वॉर्डात जाण्यापर्यंत मेडिकलच्या मुख्य इमारतीच्या चकारा माराव्या लागतात. नेत्ररोग विभागापासून या विविध विभागाचे अंतर अर्धा ते दीड किलोमीटरवर असल्याने आधीच कमी दृष्टी त्यातही ज्येष्ठ नागरिकांची मोठी संख्या राहत असल्याने रुग्णांची दमछाक होत आहे.पूर्वी नेत्ररोग विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) इमारतीतच होता. परंतु त्या जागेवर नवे अपघात विभाग निर्माण करण्यात आल्याने नेत्ररोग विभाग मुख्य इमारतीपासून काही अंतरावर असलेल्या सायकॅट्रीस्ट विभागात स्थानांतरीत करण्यात आला. याच दरम्यान पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून ५१ लाख रुपयांची यंत्रसामुग्री मिळाली. वर्षभरापूर्वीच नवीन किरकोळ शस्त्रक्रिया कक्ष आणि अद्ययावत ओपीडीचे बांधकामही झाले. सहा महिन्यापूर्वीपर्यंत विभागातच हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेन्ट सिस्टीमही (एचआयएमएस) सुरू होती. परंतु केबल तुटल्याने एचआयएमएस बंद पडले. परिणामी रुग्णांना मेडिकलच्या मुख्य इमारतीत नवीन कार्ड काढण्यासाठी जावे लागत आहे. विभागातच ही सिस्टीम सुरू करण्यासाठी ‘एचआयएमएस’ला पत्र दिले, परंतु त्यांनी निधी नसल्याचे कारण सांगून हात वर केले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नेत्ररोग विभागात मोठ्या संख्येत येणारे रुग्णांना आधिच कमी दृष्टीचा त्रास व अनेक रुग्ण हे वृद्ध आणि एकटेच येत असल्याने त्यांच्या सोयीसाठी विभागाच्यावतीने बाह्यरुग्ण विभागातच औषधालय सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु कर्मचारी नसल्याचे कारण सांगून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. विशेष म्हणजे, नेत्ररोग विभागाच्या बाह्यरुग्ण विभागातच नवीन शस्त्रक्रिया कक्ष आणि दोन वॉर्डाचे बांधकाम झाल्यास रुग्णांना सोयीचे होणार आहे. मात्र, याकडे अद्यापही कोणाचेच लक्ष गेले नसल्याने नेत्र रुग्णांचे हाल सुरू आहेत. (प्रतिनिधी)अभ्यागत मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादरनेत्ररोग विभागाच्या या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी शनिवारी झालेल्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीत अभ्यागत मंडळाच्या एका सदस्याने या संदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे. यावर अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष नितीन गडकरी याला किती गंभीरतेने घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मेडिकलमध्ये नेत्ररोग रुग्णांची फरफट
By admin | Updated: July 7, 2015 02:36 IST