नागपूर : पावसाची अनियमितता व खंड यामुळे सतत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा कृषी क्षेत्रावर परिणाम होतो. सोबतच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. यावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत जिल्ह्यातील ५२५ गावांत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार आहे. २०१४ मध्ये पर्जन्यमानात २० टक्के पेक्षा जास्त घट असलेले राज्यात १८४ तालुके आहेत. भूजल पातळीत ३ मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या तालुक्यांची संख्या ७२ आहे. २ ते ३ मीटर पेक्षा जास्त घट झालेले ११६ तर १ ते २ मीटर पेक्षा जास्त घट झालेले १९० तालुके आहेत. म्हणजेच भूगर्भातील पाणी पातळीत २ मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या तालुक्यांची संख्या १८८ इतकी आहे. राज्यातील २२ जिल्ह्यातील १९०५९ गावांत टंचाईसदृश परिस्थिती जाहीर केलेली आहे. २०१२-१३ या वर्षात टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी पुणे विभागातील पाच जिल्ह्यात जलयुक्त गाव अभियान राबविण्यात आले होते. यात विविध योजना राबवून पाणी अडविण्यासाठी व भूजल पातळीत वाढ करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला होता.यात पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकाम, जुने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध, जलस्रोतातील गाळ काढणे, विहीर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमतेने वापर आदी बाबींवर भर देण्यात आला होता. यामुळे टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी मदत झाली. या कार्यक्र माची फलश्रुती विचारात घेता राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा शासन पातळीवर निर्णय घेण्यात आला आहे. यात नागपूर जिल्ह्यात ५२५ गावांची निवड करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
पाणी टंचाईवर उतारा
By admin | Updated: January 3, 2015 02:33 IST