नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उपराजधानीतील ऐतिहासिक टेकडी गणेश मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला आणखीन सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाला वेळ मिळाला आहे.
गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात यावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका श्याम अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेवर सुनावणी करतानाच डिसेंबर २०१९ मध्ये काम पूर्ण करावे, असे आदेश देण्यात आले होते. परंतु, करोनामुळे बांधकाम रखडले. तसेच मंदिरातील भक्तांचे दर्शन देखील बंद करण्यात आले होते. दरम्यान, मंदिर बांधकाम व इतर कामे योग्य प्रकारे होत नसल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला होता. त्यामुळे मंदिर व्यवस्थापनाच्या विरोधात योग्य आदेश देण्यात यावेत, अशी विनंती करण्यात आली. याचिकाकर्त्याच्या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने महापालिकेला निरीक्षण करण्याचा आदेश दिला होता. त्या निरीक्षण अहवालानंतरच मंदिराचा सुधारित आराखडा सादर करण्यात आला होता. टेकडी गणेश मंदिराचे काम डिसेंबर २०१९ मध्येच पूर्ण करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. परंतु, करोना व लॉकडाउनमुळे मंदिराचे बांधकाम रखडले. त्यामुळे सदर बांधकाम आता येत्या सहा महिन्यात पूर्ण करावे, असा आदेश न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अविनाश घरोटे यांच्या खंडपीठाने दिला.
याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. गणेश खानझोडे यांनी तर मंदिरातर्फे अॅड. सुमित जोशी यांनी मुग्धा चांदूरकर यांनी केंद्र सरकारच्या वतीने तर जेमिनी कासट यांनी मनपाच्या वतीने बाजू मांडली.