लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या संपूर्ण इमारतीत फक्त पोलीस आयुक्तालयच राहणार, पोलीस अधीक्षक कार्यालय वेगळे राहील. गृहमंत्रालयातून या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज दिली.
राज्यातील सर्वांत स्मार्ट असे पोलीस आयुक्तालय नागपुरात बांधू, अशी घोषणा दोन वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी केली होती. भूमिपूजनानंतर या मुख्यालयाचे झपाट्याने बांधकाम सुरू करण्यात आले. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रकोपामुळे सुमारे सहा महिने बांधकामात अडसर आला. डिसेंबरपासून मात्र परत हे बांधकाम सुरू करण्यात आले. सहा माळ्यांच्या या इमारतीत पोलीस आयुक्त, सहआयुक्त, सर्व अतिरिक्त आयुक्त, दहा ही पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा तसेच सायबर पोलीस ठाणे या एकाच इमारतीत राहील. याच इमारतीच्या ४० टक्के भागात सुसज्ज पोलीस अधीक्षक कार्यालय राहिल, असे आधीच्या आराखड्यात ठरले होते. मात्र, एकाच इमारतीत अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या नेतृत्वातील कामकाज आणि दुसऱ्या भागात पोलीस अधीक्षकाच्या नेतृत्वातील कामकाज सुरू झाल्यास योग्य होणार नाही. असा सूर निघाला. एकाच्या अधिकार क्षेत्रात नागपूर शहर, तर दुसऱ्याच्या अधिकार क्षेत्रात संपूर्ण जिल्ह्याचा कारभार, असे स्वरूप असल्याने संबंधित अधिकाऱ्यांसमोर शिस्तीचे त्रांगडे निर्माण होईल. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दोन्हीकडील संख्या बघता इमारतीच्या अधिकारक्षेत्राचा भागही विसंगत असल्याचे वरिष्ठांच्या लक्षात आले. त्यातून आयुक्तालयात फक्त पोलीस आयुक्तालय व्हावे आणि अधीक्षक कार्यालय वेगळे व्हावे, अशीही कागदोपत्री मागणी गृहमंत्रालयाकडे करण्यात आली. त्याला आता मंजुरी मिळाली आहे, असे अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.
---
जूनपर्यंत होणार पूर्ण
७० ते ८० कोटी रुपयांच्या या इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. आतमधील फिनिशिंग, लाइटिंग, फर्निचरचे तसेच रंगकाम सुरू असून, चार महिन्यांत ते पूर्ण होईल. जून २०२१पर्यंत नवीन आयुक्तालयातून कामकाज सुरू होईल, असा विश्वासही पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला.
---