नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले आणि सायंकाळी एक्झिट पोलचा वर्षाव सुरू झाला. या वर्षावात कमळ फुलणार व केंद्रात एनडीएचे सरकार येणार असल्याचे भाकीत केले. यामुळे नागपूरच्या राजकीय वतरुळातही नेत्यांचा बीपी वाढला. भाजपचे राष्ट्रीय नेते गडकरी यांच्यासह शिवसेनेचे कृपाल तुमाने आजच जिंकले, असा दावा युतीचे नेते करीत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसजनांना अजूनही खा. विलास मुत्तेमवार व खा. मुकुल वासनिक विजयी होतील, अशी आशा आहे. निकालासाठी तीन दिवस शिल्लक राहिले असताना पुन्हा एकदा नागपुरात कोण जिंकणार, याबाबतच्या चर्चांना जोर चढला आहे. टीम भाजप उत्साहात आहे. गडकरी पाच नव्हे तर पन्नास हजारांहून अधिक मतांनी जिंकतील, असा दावा करीत आहे. दुसरीकडेही काँग्रेसचे बहुतांश नेतेही विलास मुत्तेमवार जिंकतीलच असे ठामपणे सांगताना दिसत नाही. मात्र, मुत्तेमवारांसाठी मैदानात झटणारी टीम पाचव्यांदा विलासभाऊच दिल्ली गाठतील, असा दावा करीत आहे. रामटेकमध्येही अशीच काहीशी चर्चा आहे. शिवसेनेचे कृपाल तुमाने हे मोठय़ा फरकाने जिंकतील, अशाच चर्चा लग्नसोहळे, साक्षगंध आदी कार्यक्रमांमध्ये रंगताना दिसत आहेत. काँग्रेस कार्यकर्तेही या चर्चांना फारसा विरोध करताना दिसत नाही. निकाल लागू द्या, वासनिकच जिंकलेले दिसतील, असा शेवटचा सूर आवळून ते चर्चेला विराम देत आहेत. भाजपचे शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे म्हणाले, मतदानाची टक्केवारी १५ टक्क्यांनी वाढली आहे. भाजपने शहरात संघटनात्मक काम केले. गडकरींनी गेली ३५ वर्षे नागपूरकरांची सेवा केली. त्यामुळे मतदारांनी त्यांना भरभरून साथ दिली आहे. ते एक लाखावर मतांनी निवडून येतील, यात शंका नाही. केंद्रात २७२ चे स्वप्न साकार होताना दिसत आहे. गडकरींना दिल्लीत पाठवून नागपूरकरही यात आपला वाटा देणार आहेत, असेही खोपडे म्हणाले. दुसरीकडे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. विरोधी लाटेत इंदिरा गांधी हरल्या तेव्हा नागपुरातून गेव्ह आवारी निवडून आले होते. सर्व समाजाने काँग्रेसला चांगले मतदान केले आहे. भाजपने वर्षभरापूर्वी प्रचार सुरू केला होता. पण शेवटी काँग्रेसने धडाका लावला व भाजपचा जोर कमी झाला. सोनिया गांधी यांनी चिखलीच्या सभेत दिलेला ‘वारे पंजा’चा नारा नागपुरात खरा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)