नागपूर : संघर्षनगर ते भांडेवाडी डम्पिंग यार्ड, गिड्डोबा मंदिर ते बीडगाव रोड व वाठोडा घाट ते चांदमारी मंदिर या तीन रोडचा वनवास संपला आहे. महानगरपालिकेने तिन्ही रोडच्या कामाचे कंत्राट दिले आहे अन् कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली आहे.
या रोडचे काम रखडल्यामुळे परिसरातील नागरिक व वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. परिणामी, चंद्रशेखर पिल्लई व इतर सहा नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून रोडचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती. दरम्यान, न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांमुळे महानगरपालिका झोपेतून जागी झाली आणि रोडचा वनवास संपला. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय नितीन जामदार व अनिल किलोर यांनी मंगळवारी ही बाब लक्षात घेता सदर याचिका उद्देश पूर्ण झाल्यामुळे निकाली काढली. गिड्डोबा मंदिर ते बीडगाव रोड विस्तारीकरण व डांबरीकरण कामाचा ४ डिसेंबर २०१९ रोजी, वाठोडा घाट ते चांदमारी मंदिर रोड सिमेंटीकरण कामाचा ५ डिसेंबर २०१९ रोजी तर, संघर्षनगर ते भांडेवाडी डम्पिंग यार्ड रोडच्या कामाचा ८ जानेवारी २०२१ रोजी कार्यादेश जारी करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. पुष्कर घारे तर, मनपातर्फे ॲड. गिरीश कुंटे यांनी कामकाज पाहिले.