उमरेड : तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण भिवापूर येथील कोविड सेंटरमध्ये औषधोपचाराठी पाठविले जात होते. ‘लोकमत’ने ४ मार्च रोजीच्या अंकात ‘गंभीर! उमरेडमध्ये कोविड सेंटरच नाही’ या शीर्षकाअंतर्गत वृत्त प्रकाशित करीत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर कोविड सेंटरसाठी हालचाली सुरू झाल्या. काही दिवसानंतर स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक संकुल ही जागा कोविड सेंटरसाठी निश्चित केल्या गेली. पाणी, स्वच्छतागृह, वीज, स्वच्छता आदी बाबींकडे जाणिवेने लक्ष पुरवित अखेरीस मंगळवारपासून उमरेड येथे कोविड सेंटर पूर्ववत सुरू करण्यात आले. प्रारंभी उमरेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह येथे कोविड सेंटर होते. कालांतराने शाळा सुरु झाल्याने याठिकाणी कोविड सेंटरची समस्या उद्भवली. त्यानंतर उमरेडच्या रुग्णांना भिवापूरला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पुन्हा उमरेड येथे कोविड सेंटर सुरू केल्या गेले.
एकूण ३८ बेड असलेल्या या सेंटरमध्ये एक वैद्यकीय अधिकारी, सहा परिचारिका आणि एक औषधी वितरक अशी चमू कर्तव्यावर राहणार आहे. अद्यापही अन्य एक वैद्यकीय अधिकारी याठिकाणी असणे गरजेचे आहे. उमरेड तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांवर याठिकाणी औषधोपचार होणार असून भिवापूर येथील उलट प्रवास वाचणार आहे. उमरेड तालुक्यातील १५ रुग्ण भिवापूर सेंटरला उपचार घेत आहेत. त्यांना सुद्धा उमरेड येथे हलविण्यात येणार आहे.
मंगळवारी सदर कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी मुख्याधिकारी सुवर्णा दखणे, तालुका आरोग्य अधिकारी संदीप धरमठोक, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एन. खानम, पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी जयसिंग जाधव, डी. पी. पाटील, डॉ. एस. एम. निंबार्ते, नायब तहसीलदार प्रदीप वरपे, निशांत नाईक, अनिल पारधी आदी उपस्थित होते. ‘लोकमत’ने या समस्येला सातत्याने वाचा फोडली. यामुळेच हे शक्य झाले, अशा प्रतिक्रिया प्रकाश वारे यांनी व्यक्त केली.