संपावर तोडगा काढण्यात प्रशासनाला अपयश
मनपा मुख्यालयावर कर्मचाऱ्यांची धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बीव्हीजी कंपनीने ११३ सफाई कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मनपा प्रशासनाला संपावर तोडगा काढण्यात अपयश आल्याने सलग तिसऱ्या दिवशी अर्ध्या शहरातील कचरा संकलन ठप्प होते. कचरा संकलन होत नसल्याने जागोजागी कचरा फेकला जात आहे. यामुळे काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत. तीन दिवसांनंतरही तोडगा न निघाल्याने सफाई कर्मचारी सोमवारी दुपारी मनपा आयुक्तांच्या कार्यालयावर धडकले. निदर्शने व जोरदार नारेबाजी करून परिसर दणाणून सोडला.
कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी युवक काँग्रेसच्या नेतृत्वात कर्मचारी आयुक्तांच्या कार्यालयावर धडकले. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढावा यासाठी काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, मनोज सांगोळे, बसपाचे मोहम्मद जमाल व नगरसेविका आभा पांडे, आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले असताना पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या १२ जणांना ताब्यात घेऊन इतरांना परिसरातून हुसकावून लावले.
....
आयुक्तांनी मागितली दोन दिवसांची वेळ
बीव्हीजी कंपनीने ११३ कर्मचाऱ्यांना काढल्याने कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर व मंगळवारी झोनमधील कचरा संकलन ठप्प आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसाची वेळ आयुक्तांनी शिष्टमंडळाला मागितली आहे. बीव्हीजी कंपनीला ७५० कर्मचाऱ्यांचीच गरज आहे. हे कर्मचारी मनपा आस्थापनेवर नसल्याने व कंपनीला कंत्राट दिला असल्याची भूमिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मांडली. कर्मचाऱ्यांना वर्षभर कुठल्या आधारावर कामावर ठेवले, असा प्रश्न शिष्टमंडळाने केला. यात मनपाला जबाबदारी टाळता येणार नसल्याचे निदर्शनास आणले.
....
तोडगा काढण्यात प्रशासनाला अपयश
अर्ध्या शहरातील कचरा संकलन सलग तीन दिवसांपासून ठप्प आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. याचा विचार करता मनपा प्रशासनाने यावर तत्काळ तोडगा काढण्याची गरज होती. मात्र यात प्रशासनाला अपयश आले आहे. महापौरांनीही यात बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. कचरा संकलन होत नसल्याने नागरिक घरातील कचरा रस्त्यावर फेकत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
...
१२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले
सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी युवक काँग्रेसच्या नेतृत्वात मनपा मुख्यालयापुढे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. आंदोलन करणाऱ्या युवक काँग्रेसच्या १२ कार्यकर्त्यांना सदर पोलिसांनी ताब्यात घेतले. कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करून सोडून दिले, तर मनपा परिसरातील कर्मचाऱ्यांना पोलिसांनी हुसकावून लावले. आंदोलनामुळे येथे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.