नागपूर : ४५ डिग्री तापमानात केवळ एका सिलिंग फॅनच्या आधाराने दिवस काढणे शक्यच नाही. अशा तापमानात पंखाही गरम वारा सोडतो. बाहेर ४५ डिग्री तापमान असतानाही नागपुरातील प्रकाश गोविंदवार यांच्या घरचे तापमान ३३ डिग्रीवर स्थिर आहे. ऐवढा उकाडा असताना त्यांच्या घरात एक सिलिंग फॅन पुरेसा ठरतो आहे. घरातील तापमान कमी करण्यासाठी गोविंदावार यांनी एक जुगाड लावला आहे. त्याला कारणीभूत ठरलेत महावितरणचे विद्युत बील.
कमाल चौक येथील रहिवासी गोविंदवार हे एक व्यावसायिक आहे. त्यांच्या घरात दोन एसी व चार कूलर आहेत. एप्रिल महिन्याचे त्यांच्या घरचे बिल १८ हजार रुपये आले होते. अजून मे आणि जून महिना बाकीच होता. गोविंदवार हे व्यावसायिक असले तरी ते छोटे-मोठे संशोधन करतात. विजेचे आलेले बिल बघून उन्हापासून बचाव करण्यासाठी काहीतरी तोडगा काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांच्या कल्पक बुद्धीतून एक उपयुक्त उपाय पुढे आला. अवघ्या ५ ते १० रुपये चौरस फुटाने सहज उपलब्ध असलेल्या हिटलॉन नावाच्या शीटचा त्यांनी उपयोग केला. घराच्या स्लॅपवर या शिटचे पांघरून घातले आणि घरातील तापमान मोजून बघितले. प्रत्यक्ष तापमानात आणि घरातील तापमानात बरीच तफावत त्यांना जाणवली.
त्यांच्या घरातील तापमान हिटलॉनमुळे कूलर व एसीविना ३३ डिग्रीवर आले आहे. पूर्वी एसी १५ डिग्री सेल्सिअसवर ठेवावा लागत होता. आता तो २६ डिग्रीवर ठेवावा लागतोय.
- ही शिट तापमान रोधक आहे. विदर्भातील लोकांचा उकाड्यापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे विजेचे बचत होते. कूलर व एअर कंडिशनवर थंड करण्याचा लोड कमी होतो. पावसाचा यावर परिणाम होत नाही. उन्हाळा संपला की गुंडाळून ठेवता येते.
प्रकाश गोविंदवार, रहिवासी, कमाल चौक