मेट्रो रेल्वे : पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडोरची पाहणीनागपूर : फ्रान्सची एएफडी आणि जर्मनीच्या केएफडब्ल्यू या वित्तीय संस्थांनंतर आता युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेनेसुद्धा (ईआयबी) मेट्रो रेल्वे प्रकल्पाला वित्तीय पुरवठा करण्याची तयारी चालविली आहे. याअंतर्गत ‘ईआयबी’च्या प्रतिनिधी मंडळाने बुधवारी मेट्रो रेल्वेच्या सिव्हिल लाईन्स येथील कार्यालयाला भेट देऊन प्रकल्पाची माहिती जाणून घेतली.नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी ईआयबीचे प्रतिनिधी मंडळ दोन दिवसीय दौऱ्यावर बुधवारी नागपुरात आले आहे. हे मंडळ या प्रकल्पाला करण्यात येणाऱ्या वित्त पुरवठ्याचा मूल्यमापन अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. ईआयबीच्या चमूने आज आॅटोमोटिव्ह चौक ते खापरी या उत्तर-दक्षिण मार्गावरील कॉरिडोरला भेट दिली. त्यानंतर त्यांनी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत विस्तृत चर्चा केली. या प्रकल्पासंदर्भातील विविध मुद्दे आणि बारकाव्यांवर बैठकीत बोलणी झाली. ईआयबीची चमू गुरुवार, ९ जुलैला प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर या पूर्व-पश्चिम कॉरिडोरची पाहणी आणि मनपा व एनआयटीचे अधिकारी आणि भागधारकांसोबत चर्चा करणार आहे. ईआयबी ही युरोपियन युनियनची बँक असून आपल्या ध्येयधोरणांर्तत मोठ्या प्रकल्पांना कर्ज पुरवठा करते. या बँकेचे युरोपमधील मोठ्या प्रकल्पांना कर्ज पुरवठा केला आहे. ९० टक्क्यांपेक्षा जास्त कर्जपुरवठा युरोपमध्ये केला आहे. ईआयबीचे व्यवस्थापन मंडळ प्रकल्पाच्या मेरिटनुसार निर्णय घेऊन कर्ज पुरवठा करते. (प्रतिनिधी)
वित्तीय मदतीसाठी युरोपियन बँकेची चमू नागपुरात
By admin | Updated: July 9, 2015 03:08 IST