दिवाळीपर्यंत भाव कमी होणार : आवक घटलीनागपूर : ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाईने उच्छाद मांडला असून, ६० ते ८० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या सांभार आणि हिरव्या मिरचीने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. ठोक बाजारात भाज्या आटोक्यात असल्या तरीही पितृपंधरवड्यात किरकोळमध्ये महागच आहेत. ही परिस्थिती केव्हा सुधारणार, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. तीन महिन्यांपासून कांदे, बटाट्याचे भाव स्थिरतीन महिन्यांपासून कळमना ठोक बाजारात कांदे आणि बटाट्याचे भाव स्थिर आहेत. मध्यंतरी कांदे पुन्हा ५०-६० रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तविली जात असताना केंद्र सरकारच्या मध्यस्थीमुळे भाव आटोक्यात राहिले. पण अतिरिक्त पावसाचा फटका उत्तर प्रदेशातील बटाटे उत्पादकांना बसला. आगरा आणि कानपूर येथून आवक असून किरकोळमध्ये भाव ३० रुपये किलोवर पोहोचले आहेत. दररोज १५ ते २० ट्रकची आवक आहे. कळमन्यात चांगल्या प्रतीच्या पांढऱ्या कांद्याचे दर प्रतिकिलो २० ते २२ रुपये असून लाल कांद्याचे भाव १६ ते १७ रुपये आहेत. किरकोळमध्ये ग्राहकांना दर्जानुसार २० ते ३० रुपयांदरम्यान खरेदी करावी लागत आहे. सध्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून नवीन कांदे बाजारात येत आहेत. या राज्यातील कांद्याला महाराष्ट्रात चांगला भाव मिळतो. त्यामुळेच एका ट्रकच्या वाहतुकीसाठी २५ हजार रुपये खर्च येत असतानाही तेथील उत्पादक कळमन्यात कांदे विक्रीसाठी आणतात. दररोज पाच ट्रक येत आहेत. महाराष्ट्रातील कांदा दिवाळीनंतर येईल. कांद्याची आवक वाढल्यानंतर भाव उतरतील, अशी शक्यता कळमना बाजारातील आलू-कांदे आडतिया असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतशी बोलताना दिली.काहीच भाज्या आटोक्यातमध्यंतरी आलेल्या पावसामुळे बहुतांश भाज्या खराब झाल्या आहेत. त्याच कारणाने भाव आकाशाला भिडले आहे. काही दिवसात आवक वाढल्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. कारले, पालक, परवळ, सिमला मिरची, तोंडले या भाज्यांकडे महागाईमुळे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. भाज्यांच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे बजेट वाढले आहे. पावसाने उघाड दिल्यानंतर पत्ताकोबी, चवळी शेंग, भेंडी, कोहळे या भाज्यांचे दर आटोक्यात आले. आवक कमी असल्याने किरकोळच नव्हे तर ठोक बाजारातही भाज्या महाग असल्याची माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतला दिली. (प्रतिनिधी)
पितृपक्षात भाज्या महागल्या
By admin | Updated: September 22, 2014 00:57 IST