मनपा कारवाईचा उपयोग काय : फूटपाथ मोकळा श्वास कधी घेणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार सर्व झोनमध्ये अतिक्रमणविरोधी पथकाच्या माध्यमातून फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई जोरात सुरू आहे. यासाठी कर्मचारी, यंत्रसामुग्री, पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. दररोज ४०० ते ५०० अतिक्रमण हटविले जात आहे. मात्र कारवाईमुळे काही वेळ फूटपाथ मोकळा श्वास घेतात. पथक माघारी फिरताच काही वेळात पुन्हा अतिक्रमण केले जाते. यामुळे अतिक्रमण कारवाईचा उपयोग काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेहरूनगर झोनच्या पथकाने मागील काही दिवसापूर्वी सक्करदरा चौकातील अतिक्रमण हटविले होते. तसेच सक्करदरा बाजारातील अतिक्रमण हटविले होते. मात्र आता दोन्ही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे.
बाभूळखेडा परिसरात धंतोली झोनच्या पथकांनी अतिक्रमण कारवाई करून फूटपाथ मोकळे केले होते. मात्र या परिसरात पुन्हा अतिक्रमण झाले आहे. अशीच परिस्थिती वर्दळीच्या नंगा पुतळा व भागातील आहे. काही दिवसापूर्वी अतिक्रमण हटविले होते. आता पूर्ववत अतिक्रमण झाले आहे. छोटा ताजबाग परिसरात अतिक्रमण कारवाई करण्यात आली होती. या परिसरातही पुन्हा अतिक्रमण झाले आहे.
बाजार भाग असलेल्या बडकस चौकात फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले होते. आता पुन्हा अतिक्रमण झाले आहे. गांधीबाग व महाल भागातही अशीच परिस्थिती आहे. अतिक्रमण पथक माघारी फिरताच या भागात विक्रेत्यांनी पुन्हा अतिक्रमण केले आहे. धरमपेठ झोनच्या पथकाने गोकुळपेठ बाजारातील अतिक्रमण हटविले होते. येथे पुन्हा भाजी व फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे.