भांगे लॉनचे अतिक्रमण हटविले: त्रिमूर्तीनगरातील मटण मार्केटवर हतोडा नागपूर : त्रिमूर्तीनगरातील सर्वोदय सोसायटीच्या चार एकर जागेवरील भांगे लॉनचे अतिक्रमण नासुप्रच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मंगळवारी हटविले. प्रतापनगर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण हटविताना लॉनच्या समोरील भागातील दुकाने हटविण्याला लोकांनी विरोध केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मनपातील विरोधी पक्षनेते व शहर काँग्रेंस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे घटनास्थळी पोहचले. त्यांच्या सूचनेनुसार नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी दुकानातील सामान काढण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिल्याने विरोध मावळला.भांगे लॉनने चार एकर जागेवर कब्जा केला होता. तसेच लॉनच्या समोरील भागात १२ दुकानाचे बांधकाम केले होते. अवैध बांधकामासंदर्भात नासुप्रने नोटीस बजावली होती. लॉन मालकांनी या विरोधात सर्वोच न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु न्यायालयाने ही याचिका खारीज केली. त्यामुळे नासुप्रने लॉन व दुकानाचे अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास पोलीस बंदोबस्तासह पथकाने अतिक्रम हटविण्याची कारवाई सुरू केली. थोड्याच वेळात लॉनचे अतिक्रमण व नाल्याच्या काठावरील अवैध पार्किग व उभारण्यात आलेली संरक्षक भिंत हटविण्यात आली. ही कारवाई नासुप्रचे विभागीय अधिकारी पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख वसंत कन्हेरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यासाठी मनपा व पोलीस विभागाची मदत घेण्यात आली.(प्रतिनिधी)अवैध मटण मार्केट हटविलेत्रिमूर्ती चौकातील नाल्याच्या काठावर असलेले अवैध मटण मार्केट हटविले. येथील २२ मटण व चिकन विक्रीची दुकाने हटविण्यात आली. परिसरातील नागरिकांनी मटण मार्केट हटविण्याची मागणी केली होती. परंतु कारवाई होत नव्हती. विकास ठाकरे यांनी मनपा सभेत या मटण मार्केटचा प्रश्न उपस्थित केला होता. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मटण मार्केट हटविण्यात येईल अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
नासुप्रचे मिशन अतिक्रमण
By admin | Updated: May 27, 2015 02:39 IST