लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : नागरिकांनी काेराेनाची भीती न बाळगता काळजी घ्यावी. नियमांचे काटेकाेरपणे पालन करा व उपचारावर भर द्यावा. ताप अंगावर न काढता टेस्ट करून औषधाेपचार घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी पर्वणी हर्षा पाटील यांनी केले. कुही तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
कुही तालुक्यात काेराेनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. ते राेखण्यासाठी प्रशासन सर्वाेताेपरी प्रयत्न करीत आहे. यामध्ये नागरिकांमध्ये जनजागृती हाेणे आवश्यक आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती व आराेग्य विभागातर्फे जनजागृती केली जात आहे. असे असले तरी काही नागरिक बेफिकीर आहेत. रुग्ण पाॅझिटिव्ह आल्यानंतरही औषधाेपचार घेण्यास नकार देतात, अशी अनेक उदाहरणे बघावयास मिळत असल्याचे तहसीलदार रमेश पागाेडे यांनी सांगितले. याबाबत बाेलताना पर्वणी पाटील यांनी नागरिकांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये, तालुक्यात कुही ग्रामीण रुग्णालय, मांढळ, वेलतूर, साळवा व तितूर प्राथमिक आराेग्य केंद्र तसेच डाेंगरगाव, मुसळगाव, वेळगाव, पचखेडी, वग, तारणा, जीवनापूर येथील आयुर्वेदिक दवाखाने आराेग्य सेवेसाठी सज्ज आहेत. कुही येथील काेविड सेंटरवर दरराेज टेस्टिंग सुरू आहे. तिथे आवश्यकता भासल्यास रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध आहे. कुणालाही काही अडचण असल्यास कुही तहसील कायार्लयातील कंट्राेल रूमला (०७१००-२२२२३६) संपर्क साधून माहिती द्यावी. कुणीही घाबरून जाऊ नका, याेग्यवेळी उपचार घ्यावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.