विवेक ओबेरॉय : भोसला मिलिटरी स्कूलतर्फे कारगील विजयदिन साजरानागपूर : देशवासीयांसाठी स्वत:च्या प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांना पैसे किंवा नावाचा कधीच मोह नसतो. त्यांना आपल्या देशवासीयांकडून केवळ सन्मान हवा असतो. एवढे आपण त्यांना नक्की देऊ शकतो. परंतु आजच्या फेसबुक व व्हॉटस् अॅपच्या काळात भावनांचा ओलावाच संपला आहे. कारगील विजयासारख्या विशिष्ट दिवशी अनेक जण सोशल मीडियावर (फेसबुक व व्हॉटस् अॅपवर) सैनिकांना आदरांजली वाहणारी एखादी पोस्ट टाकून आपापल्या कामाला लागतात, असे मत चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉयने व्यक्त केले.नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित भोंसला मिलिटरी स्कूलतर्फे रविवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात कारगील विजयदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी तो सन्माननीय अतिथी म्हणून बोलत होता. कामठी येथील गार्डस् रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर डी. व्ही. सिंग प्रमुख अतिथी होते. संस्थेचे उपाध्यक्ष कुमार काळे, नागपूर विभागाचे सचिव तरुण पटेल, शाळेचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर, कमांडंट कर्नल जे. एस. भंडारी व प्राचार्य ललित जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.कारगील विजयदिनासारख्या विशिष्ट प्रसंगीच आपल्यामध्ये देशभक्ती संचारते. तीन-चार दिवसांनंतर सर्वजण आपापल्या कामाला लागतात. देशाच्या संरक्षणासाठी सैनिक प्राणांची आहुती देतात, हे आपण विसरून जातो. आपण केवळ स्वत:चा विचार करणे सोडले पाहिजे. देशासाठी काय योगदान देता येईल, ही भावना प्रत्येकाच्या मनात असायला हवी, असे विवेक म्हणाला. त्याने भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांमधील शिस्त व संयमाची प्रशंसा केली. हे दोन गुण जीवनभर सोबत राहतात व त्याचा देशाला लाभ मिळतो. मी अभिनेता नसतो तर आर्मीत असतो, असे त्याने सांगितले.कारगील युद्धाबद्दल बोलताना डी. व्ही. सिंग म्हणाले, पाकिस्तानी घुसखोरांना श्रीनगरला लेहपासून तोडून संपूर्ण उत्तर भाग स्वत:च्या ताब्यात घ्यायचा होता. भारताला वेळेवर घुसखोरीची माहिती मिळाल्यामुळे त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ शकले नाही. कारगील युद्ध लढले गेले तो भाग अतिशय थंड असतो. या युद्धात लढलेल्या तुकड्यांचे नेतृत्व तरुण लेफ्टनंट व कॅप्टन्सनी केले होते. देशभक्ती त्यांची ताकद होती व भारतवासीयांच्या प्रेमामुळे त्यांना लढण्याची स्फूर्ती मिळत होती.कारगील युद्धात शहीद झालेले कॅप्टन विक्रम बत्रा प्रशिक्षणादरम्यान सामान्य कॅडेटसारखेच होते. परंतु, युद्धभूमीवरून त्यांना ‘ये दिल माँगे मोअर’ असे म्हणताना एका चॅनेलवर पाहिल्यानंतर छाती अभिमानाने फुलली. अशीच स्फूर्ती, समर्पणभाव व परिश्रम करण्याची तयारी भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये पहायला मिळाली. या मुलांना मिलिटरी शाळेत टाकणारे पालकही देशभक्त आहेत. असे देशप्रेम सतत कायम राहिल्यास सैनिक कधीच या देशाला शत्रूच्या ताब्यात जाऊ देणार नाही. ते जाती-धर्माची बंधने तोडून देशाला पुढे घेऊन जातील असा विश्वास सिंग यांनी दिला. तरुण पटेल यांनी प्रास्ताविक केले तर, शैलेश जोगळेकर यांनी आभार मानले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशाच्या व्हिडिओफितीचे प्रसारण करण्यात आले. (प्रतिनिधी)त्या सैनिकाला मदत करणे अभिमानास्पद४विवेक ओबेरॉयने एका सैनिकाला मदत केल्याची जुनी आठवण सांगितली. त्यावेळी विवेक १६ वर्षांचा होता. तो रेल्वेने मुंबईला परत येताना एक सैनिक, पत्नी व ६ महिन्यांच्या मुलासह त्याच्या डब्यात चढला. त्यांच्याकडे तिकीट होते पण, आरक्षण पक्के झाले नव्हते. यामुळे विवेकने सैनिकाच्या पत्नीला स्वत:चा बर्थ दिला व तो स्वत: खाली झोपला. कडाक्याच्या थंडीमुळे कुडकुडलो होतो पण, सैनिकाला मदत केल्याचा आपल्याला अभिमान आहे, असे विवेकने सांगितले.सैनिकांवर चित्रपट काढण्याची घोषणा४विवेक ओबेरॉयने सैनिकांवर चित्रपट काढण्याची घोषणा कार्यक्रमात केली. या देशाचे सैनिक खरे हिरो आहेत. देशासाठी ते स्वत:च्या प्राणांची चिंता करीत नाही, असे तो म्हणाला. विवेकने दिलेल्या माहितीनुसार त्याचे आजोबा आर्मीत होते. ते पाकिस्तानविरुद्धच्या एका युद्धात लढले होते. आजोबांनी सांगितलेल्या युद्धकथा ऐकून शरीरावर रोमांच उभे होत होते, असे सांगून विवेकने सेंट्रल हिंदू मिलिटरी शिक्षण संस्थेला आवश्यक ती मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.
सोशल मीडियामुळे भावनांचा ओलावा संपला
By admin | Updated: July 27, 2015 04:07 IST