नागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या विकासात नागपूर सुधार प्रन्यासची (नासुप्र) भूमिका जाणून घेण्यासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या (ईआयबी) चमूने गुरुवारी दुपारी नासुप्रच्या कार्यालयाला भेट दिली. चर्चेनंतर ‘ईआयबी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मेट्रो रेल्वेला कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.ईआयबीच्या चमूत उपआर्थिक सल्लागार पिअर्स विकेर्स, सामाजिक विकास तज्ज्ञ स्लदजान कोसी आणि दक्षिण आशियाचे कन्ट्री व्यवस्थापक सुनीता लुक्कहू यांचा समावेश होता. नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनी सांगितले की, एसपीयू कंपनी स्थापन होण्यापूर्वी केंद्र शासनाने या प्रकल्पासाठी नासुप्रची नोडल एजन्सी म्हणून निवड केली होती. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी नासुप्रने एनआयटीची नियुक्ती केली. तसेच सर्वसमावेशक बहुपयोगी आणि विकासात्मक आराखडा तसेच नागपूर शहरासाठी फीडर बस यंत्रणेच्या नियोजनासाठी यूएमटीसीची नासुप्रने नियुक्ती केली. याशिवाय नागपूर मेट्रोच्या प्रशासकीय इमारतीसाठी दीक्षाभूमी येथे जागा उपलब्ध करून दिली आणि प्रकल्पाला आर्थिकदृष्ट्या मदत केली. चालू आर्थिक वर्षात नासुप्र अनुदान स्वरूपात १५० रुपयांची आर्थिक मदत प्रकल्पाला करणार आहे. त्यापैकी सध्या ३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. श्याम वर्धने हे नागपूर मेट्रोचे संचालक आहेत. ‘ईआयबी’च्या चमूने नागपूर शहर आणि नागपूर मेट्रो रिजनच्या विकासात नासुप्रच्या भूमिकेची विचारणा केली. बँकेच्या सर्वच अधिकाऱ्यांनी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाशी जुळण्याचे आणि कर्ज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नासुप्रचे अधीक्षक अभियंते सुनील गुज्जलवार, ए.ई. हाऊसिंगचे संदीप बापट आणि नागपूर मेट्रोचे सोनवणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘ईआयबी’ मेट्रो रेल्वेला कर्ज देणार
By admin | Updated: July 10, 2015 03:01 IST