ग्रामायण प्रतिष्ठानच्या सेवा प्रदर्शनाच्या निमित्ताने आयईटीईच्या सहकार्याने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्राम उपयोगी तंत्रज्ञान या विषयावर वर्किंग मॉडेल स्पर्धा आयोजित करण्यात आली.
अंडी उबवणारे 'इनक्युबेटर' अन् फवारणी करणारे ड्रोन
ठळक मुद्दे‘वर्किंग मॉडेल’ स्पर्धा : विद्यार्थ्यांनी सादर केले एकापेक्षा एक सरस मॉडेल
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंड्यातून पिले तयार करणारे इनक्युबेटर, शेतीत फवारणीसाठी उपयोगी पडणारे ड्रोन, घर बसल्या शेतातील पाण्याची मोटर तसेच इतर उपकरणे एसएमएसच्या माध्यमातून सुरू करणारे मॉडेल असे शेतीला लागणारे उपयुक्त प्रयोग विविध अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामायण आणि आयईटीईच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्किंग मॉडेल स्पर्धेत सादर केले.ग्रामायण प्रतिष्ठानच्या सेवा प्रदर्शनाच्या निमित्ताने आयईटीईच्या सहकार्याने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्राम उपयोगी तंत्रज्ञान या विषयावर वर्किंग मॉडेल स्पर्धा आयोजित करण्यात आली. दक्षिण अंबाझरी मार्गावरील प्रोफेसर राजेंद्रसिंह सायन्स एक्स्प्लोरेटरी येथे आयोजित या स्पर्धेत विविध अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी १७ मॉडेल सादर केले. यात अंड्यातून पिले तयार करणारे इनक्युबेटर, शेतात फवारणी करणारे ड्रोन, एसएमएसच्या माध्यमातून शेतातील उपकरणे सुरु करणारे मॉडेल, चारोळी फोडणारे तंत्रज्ञान, भाजीपाला साठविण्यासाठी कोल्ड स्टोरेज आदी प्रयोग सादर करण्यात आले. यात कमिन्स कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, व्हेटरनरी कॉलेज, झुलेलाल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नालॉजी, नागपूर इन्स्टिट्युट आॅफ टेक्नालॉजी, सेंट विन्सेंट पलोटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, रामदेवबाबा कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, राजीव गांधी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, एस. बी. जैन कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांनी मॉडेल सादर केले. मॉडेलचे परीक्षण नीरीच्या शास्त्रज्ञ डॉ. लीना देशपांडे, बीएसएनएलचे सेवानिवृत्त अधिकारी अजय सावतकर, उद्योजक डॉ. संदीप शिरखेडकर यांनी केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक शुभम मंधाले, द्वितीय शिवानी श्रीखंडकर, तृतीय स्वप्नील कुर्वे यांना देण्यात आला. तर उत्तेजनार्थ पारितोषिक अंजली पुरी, गौरव पराते आणि सारंग मिश्रा यांना देण्यात आले. डॉ. सुहास बुद्धे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी समन्वयक डॉ. भारतभूषण जोशी, डॉ. राजेंद्र काळे, प्रशांत बुजोणे, सौरभ निमकर, ग्रामायणचे अध्यक्ष अनिल सांबरे उपस्थित होते.