नागपूर : अनेक विद्वान हसत नाहीत. हसल्याने आपली विद्वत्ता कमी होईल काय अशी भीती त्यांना असेल. परंतु बाबुरावांनी विद्वान असूनही विनोदी स्वभाव जोपासला. हास्य विनोद करीत असताना त्यांच्यातील सहजता प्रत्येकालाच प्रभावित करायची, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले.
स्व. मा. गो. वैद्य यांच्या भट सभागृहात आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंकज चांदे, ज्येष्ठ पत्रकार ल. त्र्यं. जोशी, सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते. भैय्याजी जोशी म्हणाले, बाबुरावांनी जे काही केले ते समाजासाठीच. त्यांची भक्ती भारतमातेवर होती. त्यांनी मातृभूमीची साधना केली. आपल्या हातून शब्दांच्या संदर्भात चुका होऊ नये म्हणून ते सजग राहायचे. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या विरोधात एखाद्याने मत मांडले तर बहुतांश मंडळी त्याला ऐकतच नाहीत. मात्र बाबुराव प्रतिकूल मतांनाही ऐकून प्रतिवाद करायचे. संचालन दयाशंकर तिवारी यांनी केले. कार्यक्रमात अमर कुळकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. कार्यक्रमाची सांगता केतनकुमार यांनी शांतिमंत्र म्हणून केली.
.............
बाबुराव हटके होते : नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, बाबुरावांचे व्यक्तिमत्त्व हटके होते. ते तत्त्वचिंतक होते. संघविचार ते जगले. सुस्पष्ट विचार मांडायचे, कोणाला काय वाटेल याची तमा न बाळगता ते बोलायचे. सर्वच क्षेत्रात त्यांचा वावर प्रत्येकाला जाणवायचा. यामुळे त्यांच्याकरिता इंग्रजीतील जिनिअस हाच शब्द योग्य ठरेल.
धाडसाचे कौतुक करायचे : डॉ. मनमोहन वैद्य
सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले, माझे वडील आईला नेहमी सांगायचे की, माझा एक पाय कुटुंबात राहील तर दुसरा संघात. अशाही स्थितीत आईने त्यांना साथ दिली. सर्वच क्षेत्रात त्यांचा वावर असला तरी ते आम्हाला विशेषत: सर्व कुटुंबाला वेळ द्यायचे. मुलाने धाडस केले तर त्याचे कौतुकही करायचे. बाबुराव धाडसाला महत्त्व देणारे व्यक्तिमत्त्व होते, असे ते म्हणाले.
.............