भाजपची उमेदवारी दिल्लीत अडली : काँग्रेसकडून गिरीश पांडव यांची चर्चा नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज, बुधवार शेवटचा दिवस आहे. असे असले तरी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांचे उमेदवार ठरले नव्हते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे विद्यमान आमदार राजेंद्र मुळक यांनी पक्षाला नकार कळविला असून पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्यावर दबाव सुरू आहे. रात्री उशिरा गिरीश पांडव यांचे नाव समोर आले. दुसरीकडे भाजपचीही उमेदवारी दिल्लीत अडली असल्याचे सांगण्यात आले.काँग्रेसचे आ. राजेंद्र मुळक हे सुरुवातीपासूनच लढण्यास इच्छुक नव्हते. मात्र शेवटी तेच लढतील, असा दावाही केला जात होता. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी मुळक यांची मंगळवारी बैठक झाली. तीत मुळक यांनी संख्याबळ अपुरे पडत असल्याचा लेखाजोखा मांडत लढण्यास असमर्थता व्यक्त केली होती. दरम्यान, मंगळवारी काँग्रेसच्या मोर्चानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मुळक यांच्या उमेदवारीबाबत विचारणा केली असता त्यांनीही मुळक लढण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. या घटनाक्रमानंतर रात्री काँग्रेसच्या उमेदवाराचा शोध सुरू झाला. शेवटी काँग्रेसचे गिरीश पांडव यांना विचारणा करण्यात आली. पांडव यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची रात्री १० च्या सुमारास भेट घेतली. यावेळी काही काँग्रेस नेतेही उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पांडव यांनी विचार करण्यासाठी पक्षाला वेळ मागितला. याच वेळी प्रसिद्ध बँक व्यवसायी प्रमोद मानमोडे यांच्या नावावरही चर्चा झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव घारड किंवा दक्षिण नागपुरातील नगरसेवक संजय महाकाळकर यांच्यापैकी कुणाला ऐनवेळी निवडणूक लढण्याचे आदेश पक्षातर्फे दिले जाऊ शकतात, असे एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले. संख्याबळाचा विचार करता भाजपचे बहुमत आहे. महापौर प्रवीण दटके, माजी आ. अशोक मानकर, प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास, माजी जि.प. अध्यक्ष रमेश मानकर यांनी दावा केला आहे. मात्र, उमेदवारी कुणाला द्यायची हा पेच रात्री उशिरापर्यंत सुटला नाही. भाजपचे सर्व आमदार, पदाधिकारी रात्री एकमेकांना मोबाईल करून उमेदवारीबाबत विचारणा करीत होते. मात्र, कुणाकडेही कन्फर्म नाव नव्हते. (प्रतिनिधी)
मुळकांचा नकार पक्षश्रेष्ठींकडून दबाव
By admin | Updated: December 9, 2015 03:17 IST