नागपूर: फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नागपूर विभागात झालेल्या पीक हानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून सर्वाधिक हानी ही नागपूर जिल्ह्यात झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे. यामुळे विभागातील ५४ हजार शेतकरी बाधित झाले असून एकूण २० हजार ८०० हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. नागपूर जिल्ह्यात १८ शेतकऱ्यांचे १२ हजार हेक्टरवरील पीक बाधित झाले आहे. यात दोन हजार हेक्टरवर फळबाग तर ९७०० हेक्टरवरील रबी पिकांचा समावेश आहे. दरम्यान शासनाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी प्रशासनाने ११ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यावर मदत वाटप सुरू होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात विदर्भात अवकाळी पाऊस झाला. यामुळे रबी पिकांची त्याच प्रमाणे फळबागांची मोठी हानी झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विभागातील एकूण सहा जिल्ह्यांमध्ये ५४ हजार ९०० शेतकऱ्यांच्या २० हजार ८०० हेक्टरवरील पिकांची हानी झाली. यात रबी पिकांचे क्षेत्र १८,४०० हेक्टर आणि फळबागाचे क्षेत्र २३४० हे.चा समावेश आहे. सर्वाधिक हानी नागपूर जिल्ह्यात झाली. १८,६०७ शेतकऱ्यांच्या १२,०५० हे. पिकांची हानी झाली. यात रब्बी पिकांचे क्षेत्र ९७९४ हे. तर फळबागांचे क्षेत्र २२५६ हेक्टरचे आहे.दुसरा क्रमांक चंद्रपूर जिल्ह्याचा आहे. या जिल्ह्यात २४,५७६ शेतकऱ्यांच्या ७१५५ हेक्टरवर पिकांची हानी झाली. भंडारा जिल्ह्यातील ११,७७७ शेतकऱ्यांच्या १६०० हेक्टरवरील पिकांची, चंद्रपूर जिल्ह्यात २४,५०० शेतकऱ्यांच्या ७१५५ हेक्टरवरील पिकांची हानी झाली. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पीकहानीचे प्रमाण नगण्य आहेशासनाच्या निकषानुसार ५० टक्केपेक्षा जास्त पीक हानी झालेल्या शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. त्यासाठी शासनाकडे ११.७० कोटी रुपयांची मागणी करण्यात आहे. यात नागपूर जिल्ह्यासाठी ७ कोटी ११ लाख. भंडारा जिल्ह्यासाठी १ कोटी ३४ लाख, चंद्रपूर जिल्ह्यासाठी ३ कोटी २६ लाख रुपयांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
अवकाळी पावसाने ५४ हजार शेतकरी बाधित
By admin | Updated: April 12, 2015 02:36 IST