देवेंद्र फडणवीस : रोजगार निर्मिती होणारनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी वर्धा आणि औरंगाबादला ‘ड्राय पोर्ट’ उभारण्याची घोषणा केली. यामुळे विदर्भ आणि मराठवाडा हे प्रदेश आंतरराष्ट्रीय नकाशावर येईल. या भागातील उद्योगाला त्याचा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.मुंबईजवळील जेएनपीटीमध्ये शनिवारी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गडकरी यांनी विदर्भातील वर्धा आणि मराठवाड्यातील औरंगाबाद येथे ‘ड्राय पोर्ट’ उभारण्याची घोषणा केली. या घोषणेचे देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. ‘ड्राय पोर्ट’ उभारल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील निर्यातदारांना त्याचा फायदा होईल व आयातदारांची सोय होईल. आयात-निर्यात मालासाठी बंदरावर कस्टमच्या मंजुरीसह ज्या प्रक्रिया पार पाडायच्या असतात, त्या सर्व ‘ड्राय पोर्ट’वर पार पाडल्या जातात. गडकरींच्या घोषणेमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात समुद्र नसतानाही बंदराची व्यापारी सुविधा मिळेल. या माध्यमातून या भागातील उद्योगाला चालना मिळेल व त्यातून रोजगार निर्मितीही होईल, असे फडणवीस यांनी कळविले आहे. उपलब्ध साधनांचा देशाच्या विकासासाठी कल्पकतेने वापर करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)भाजप कार्यालयात ध्वजारोहणनागपूर : महाराष्ट्राला काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारपासून मुक्ती मिळाल्यावरच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यदिन साजरा होईल,असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपच्या शहर कार्यालयात फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. देशात सुराज्य आणण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मात्र यासाठी फक्त दिल्लीतील परिवर्तन पुरेसे नाही तर महाराष्ट्रासह इतरही राज्यांत परिवर्तन करावे लागेल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले. कार्यक्रमाला आमदार सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, महापालिकेतील सत्ता पक्षनेते प्रवीण दटके, प्रमोद पेंडके उपस्थित होते.
ड्राय पोर्टच्या घोषणेमुळे विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना लाभ
By admin | Updated: August 17, 2014 00:52 IST