खापरखेडा : कार्तिक एकादशीला राज्य शासनाने ‘ड्राय डे’ जाहीर केला असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा (डाकबंगला) (ता. सावनेर) येथे धाड टाकून अवैध दारू विक्रेत्यास अटक केली. त्याच्याकडून सात हजार रुपयाची ७० लिटर माेहफुलाची दारू जप्त केली. ही कारवाई गुरुवारी (दि. २६) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अब्दुल वसीम नकीब खान (३५, रा. वलनी काॅलनी, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी दारू विक्रेत्याचे नाव आहे. गुरुवारी कार्तिक एकदशी असल्याने राज्य शासनाच्या आदेशान्वये पाेलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात एका दिवसासाठी दारू विक्रीवर बंदी (ड्राय डे) घातली हाेती. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खापरखेडा परिसरात गस्तीवर असताना त्यांना पिपळा (डाकबंगला) येथे दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी पाहणी केली.
त्यांना पिपळा (डाकबंगला) येथील कुचक माेहल्ल्यात अब्दुल वसीम नकीब खान माेहफुलाची दारू विक्री करीत असल्याचे आढळून येताच त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली, शिवाय त्याच्याकडून माेहफुलाची ७० लिटर दारू जप्त केली. त्या दारूची एकूण किंमत सात हजार रुपये असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फाैजदार लक्ष्मीप्रसाद दुबे यांच्या नेतृत्वात विनाेद काळे, प्रणय बनाफर, वीरेंद्र नरड, अरविंद भगत, सत्यशील काेठारे, साहेबराव बहाळे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी खापखेडा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.