साथीदारांची शोधाशोध : आणखी काहीजणांना अटक होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात ड्रग स्मगलर आशी डे हिच्या नेटवर्कचे खोदकाम सुरू आहे. तिच्या साथीदारांचीही पोलिसांनी शोधाशोध चालविली आहे. त्यामुळे लवकरच आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आशी गेल्या अनेक महिन्यांपासून अमली पदार्थाच्या गोरखधंद्यात सक्रिय आहे. उत्तर नागपुरातील तिच्या अड्ड्याचा गेल्या वर्षी पत्ता लागल्यानंतर ती तेथून गायब झाली. चार महिन्यांपूर्वी तिने इंद्रप्रस्थ नगरातील एका अपार्टमेंटमध्ये आठ हजार रुपये महिन्याने भाड्याची सदनिका घेतली. येथून ती एमडीची विक्री करीत होती. मध्यरात्रीनंतर ती राहत असलेल्या अपार्टमेंटच्या खाली धनिकबाळ, बड्या घरच्या मंडळीची, बुकी आणि अवैध धंद्यात गुंतलेल्या गुन्हेगारांची वर्दळ असायची. तिने आपल्या सदनिकेच्या आजूबाजूला सीसीटीव्ही लावले होते. हे सीसीटीव्ही आशीच्या मोबाईलमध्ये कनेक्ट होते. त्यामुळे ती कुठेही असली तरी आपल्या सदनिकेच्या आजूबाजूला काय सुरू आहे, ते तिला बघता येत होते. आशीने एमडी तसेच चरसच्या तस्करीतून मोठे नेटवर्क तयार केले होते. त्यात अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणींचाही सहभाग होता. ती प्रत्येक वेळी लाखोंची खेप बोलावत होती. दि. १७ मे रोजी तिच्यासाठी मुंबईहून सलमान खान नामक तस्कर १३ लाखांची एमडी आणि चरस घेऊन आला. त्याच्यावर नजर ठेवून असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. त्याच्या चौकशीतून त्याचे आणि आशीचे लागेबांधे उघड झाले. त्यानंतर २१ मे रोजी आशी गुन्हे शाखेच्या हाती लागली. सध्या ती कोठडीत आहे. पोलिसांनी तिच्या सदनिकेतून ड्रग्ज, इलेक्ट्रॉनिक (डिजिटल) तिजोरी, रोख आणि बरेच काही जप्त केले. आता पोलीस तिच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.
---
धक्कादायक खुलासे अपेक्षित
आशीला ड्रग्ज तस्करीत काही भ्रष्ट ‘पोलीस मित्रां’चीही मदत मिळत होती. त्यांना आशीकडून एमडी आणि तगडी मलई मिळत होती, अशी चर्चा आहे. त्याचमुळे ती पोलिसांच्या कारवाईत अडकत नव्हती, असेही बोलले जाते. यासंबंधाने तिला आता विचारपूस केली जात असून, आशीच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
---