सज्जन पाटील
लाेकमत न्यूज नेटवर्क
मांढळ : सावळा (ता. कुही) ग्रामपंचायतची सार्वत्रिक, तसेच सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. नवा आदर्श निर्माण व्हावा, म्हणून या ग्रामपंचायत प्रशासनाने ड्रेस काेड लागू करण्याचा निर्णय घेतला. यात प्रशासनाने सरपंच, उपसरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांना कार्यालयीन कामात सहभागी हाेताना, पांढऱ्या रंगाचे कपडे अनिवार्य केले आहेत. ड्रेस काेड लागू करणारी साळवा ग्रामपंचायत कुही तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
साळवा येथे सार्वत्रिक निवडणुकीत एकाच पॅनलचे सर्व सदस्य निवडून आले आहेत. यात नवनिर्वाचित सरपंच नितेश मेश्राम, उपसरपंच पुष्पा राघोर्ते, ग्रामपंचायत सदस्य राजेश गायधने, संदीप खारकर, ज्ञानेश्वर नारनवरे, राजहंस थोटे, उषा वाईलकर, निरंजना सहारे, विशाखा पाटील व प्रियांका गजभिये यांचा समावेश आहे. सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी ही सर्व मंडळी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून ग्रामपंचायत कार्यालयात आले हाेते, हे विशेष.
प्रमाेद घरडे यांच्या सूचनेवरून गावात आधुनिक पद्धतीच्या ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम करण्यात येईल. गावात सांडपाण्यासाठी शाेषखड्डे तयार केले जातील. गावातील प्रत्येक चाैकाचे साैंदर्यीकरण केले जाईल. गावात राेजगार निर्मिती करण्यावर भर दिला जाईल. बचत गटांना काम उपलब्ध करून दिले जाईल, असेही सरपंच नितेश माेश्राम व प्रमाेद घरडे यांनी संयुक्तरीत्या सांगितले. यावेळी विलास चांदनखेडे, ॲड.वंजारी, माजी सरपंच सहारे, बाबा सहारे यांच्यासह नागरिक उपस्थित हाेते.
...
उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई
ग्रामपंचायत पदाधिकारी व सर्व सदस्य ग्रामपंचायत कार्यालयात येताना, तसेच कार्यालयीन कामात सहभागी हाेताना या ड्रेसकाेडचे काटाेकाेर पालन करतील. जे या नियमाचे उल्लंघन करेल, त्यांच्यावर ५०० रुपयांचा दंड ठाेठावण्यात व ताे वसूल करण्यात येणार असल्याचाही निर्णय घेण्यात आला. ड्रेस काेडची संकल्पना प्रमाेद घरडे यांच्या प्रेरणेने लागू करण्यात आल्याचे नवनिर्वाचित सदस्यांनी सांगितले.