पोलीस आल्यावरच उघडला दरवाजा नागपूर : कोळसा व्यापाऱ्याच्या घरावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाती परत यावे लागले. इतकेच नव्हे तर या धाडीदरम्यान घडलेल्या नाट्यामुळे आयकर विभाग आणि पोलिसांची चांगलीच फजिती झाली. आयकर विभागाचे अधिकारी मंगळवारी रात्री १० वाजता रामदासपेठ येथील राजेंद्र अग्रवाल यांच्या बंगल्यावर धडकले. रात्रीची वेळ असल्याने अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी दरवाजा उघडला नाही. यादरम्यान अग्रवाल यांचे नातेवाईक आणि मित्रही पोहोचले. त्यांनी आयकर अधिकाऱ्यांना ‘सर्च वॉरंट’ दाखवण्यास सांगितले. आयकर अधिकाऱ्यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने अग्रवाल कुटुंबीयांनीसुद्धा त्यांना प्रतिसाद दिला नाही. दरवाजा उघडत नसल्याने आयकर अधिकाऱ्यांनी सीताबर्डी पोलिसांना बोलावले. यादरम्यान बंगल्याबाहेर बरीच गर्दी झाली. पोलीस आल्यावर अग्रवाल कुटुंबीयांनी दरवाजा उघडला. पोलिसांच्या मदतीने आयकर अधिकाऱ्यांनी बंगल्याची तपासणी केली. या तपासणीत पोलीस आणि आयकर विभागाच्या हाती काहीही सापडले नसल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे दुखावलेल्या अग्रवाल यांच्या मित्रांनी विनाकारण त्यांना त्रास देण्यात आल्याची पोलिसांना तक्रार केली. यावर पोलिसांचे म्हणणे होते की, ते आयकर विभागाच्या बोलावण्यावरच आले. सीताबर्डी पोलिसांनी अग्रवाल यांच्या कुटुंबीयाकडे ‘नील पंचनामा’ सोपविला आणि परत गेले. नोटाबंदीपासून आयकर विभागाचे धाडसत्र वाढले आहे. सातत्याने कारवाई सुरू आहे. सरकारने काळ्या पैशाबाबत ई-मेल आणि इतर दुसऱ्या माध्यमाने माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले होते. यानंतर आयकर विभागांकडे मोठ्या प्रमाणावर माहिती येत आहे. व्यावसायिक वैमनस्यातूनही तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे मंगळवारी घडलेले नाट्य इतर ठिकाणीसुद्धा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)
आयकर धाडीत घडले नाट्य
By admin | Updated: December 22, 2016 02:46 IST