लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांना इंग्लंड येथील रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अॅन्ड चाईल्ड हेल्थच्या वतीने फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. बालरोग चिकित्सा क्षेत्रातील ही सर्वोच्च फेलोशिप आहे. बाळांच्या आरोग्यासाठी अमूल्य योगदान दिल्यामुळे त्यांची या फेलोशिपकरिता निवड करण्यात आली होती.कॉलेजचे अध्यक्ष प्रा. रसेल विनेर व मुख्य कार्यकारी अधिकारी जो रेविल यांच्या हस्ते डॉ. बोधनकर यांना ही फेलोशिप प्रदान करण्यात आली. डॉ. बोधनकर यांनी फेलोशिप स्वीकारल्यानंतर बोलताना या यशाचे श्रेय नागपूरकर शुभेच्छुकांना दिले. त्यांना १९९२ मध्ये जेसीआय यूएसएचा आऊटस्टॅन्डिंग यंग पर्सन ऑफ इंडियन अवॉर्ड मिळाला आहे. २००९ मध्ये त्यांना राणी एलिझाबेथ यांनी निमंत्रण पाठवले होते. तसेच, ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठाने व्याख्यानासाठी बोलावले होते. याचवर्षी त्यांना चीनचा ऑऊटस्टॅन्डिंग पेडियाट्रिशियन ऑफ एशिया पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. याशिवायही महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ते अमेरिकन अकॅडेमी ऑफ पेडियाट्रिक्स, एशियाटिक सोसायटी फॉर पेडियाट्रिक रिसर्च, कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अॅन्ड डिसॅबिलिटी, इंडियन जर्नल ऑफ पेडियाट्रिक्स, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स इत्यादी संस्थांशी जुळले आहेत.
डॉ. उदय बोधनकर यांना ‘आरसीपीसीएच’ची फेलोशिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 22:35 IST